अमेरिकेच्या कॉन्व्हेंट शाळेतून विहानचा आटपाडीच्या जिल्हा परिषद शाळेत प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 13:43 IST2025-06-17T13:43:53+5:302025-06-17T13:43:53+5:30

विद्यार्थी भारावले : शासकीय शाळांमधील गुणवत्तेचा पालकांकडून आदर

Vihan Shelke gets admission in Zilla Parishad School in Atpadi from American convent school | अमेरिकेच्या कॉन्व्हेंट शाळेतून विहानचा आटपाडीच्या जिल्हा परिषद शाळेत प्रवेश

अमेरिकेच्या कॉन्व्हेंट शाळेतून विहानचा आटपाडीच्या जिल्हा परिषद शाळेत प्रवेश

लक्ष्मण सरगर

आटपाडी : शिक्षणाच्या शोधात अनेक पालक आपली मुलं परदेशातील प्रतिष्ठित शाळांमध्ये घालतात. मात्र, परदेशात स्थायिक असूनही आपल्या मुलाला मातृभाषेत शिक्षण मिळावं म्हणून भारतात परत येण्याचे पाऊल कुणी उचलत नाही. आटपाडी तालुक्यात सोमवारी नेमकं असंच विलक्षण व कौतुकास्पद पाऊल एका पालकांनी उचललं. अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या शेळके कुटुंबीयांनी आपला मुलगा विहान याला थेट जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता दुसरीमध्ये दाखल केलं.

विहान याचे वडील विजयकुमार शेळके आणि आई भारती हे दोघंही सध्या न्यूयॉर्कमध्ये आयटी इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत. विहान याचं शिक्षण उत्तर कॅरोलिनाच्या शार्लोट येथील हॉक रिज प्राथमिक शाळेत सुरू झालं होतं. मात्र, मराठी भाषेशी त्याचं व शिक्षणाशी घट्ट नातं तयार व्हावं, मातीत रुजलेली मूल्यं आत्मसात व्हावीत, या उद्देशाने पालकांनी विहानचं शिक्षण काही काळासाठी भारतातच, तेही मराठी माध्यमातून करायचा असा निर्णय घेतला.

त्यामुळे विहानला त्याचे मामा डॉ. उमेश बालटे यांच्या गावी, म्हणजेच आटपाडीत आणण्यात आलं. सांगोला हे शेळके कुटुंबाचं मूळ गाव असलं तरी आजोळ आटपाडी असल्याने जिल्हा परिषदशाळा क्रमांक १ ची निवड त्याच्यासाठी करण्यात आली. सोमवारी विहानसह इतर नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबफूल देऊन स्वागत करण्यात आलं.

मुलाला मराठी कसलेच बोलता येत नाही. त्याचा संभाळ करत असतानाही अनेक अडचणी येत असल्याने व आपल्या मातीशी मुलाची नाळ जोडली जावी म्हणून त्यांच्या आईवडिलांनी विहानचा प्रवेश आटपाडी येथील मराठी शाळेत घेतला. - डॉ. उमेश बाटले, विहानचे मामा

Web Title: Vihan Shelke gets admission in Zilla Parishad School in Atpadi from American convent school