Shivkumar Sharma: ज्येष्ठ संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मांनी सांगलीत मोडला होता स्वत:चा नियम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 12:19 PM2022-05-11T12:19:02+5:302022-05-11T12:19:50+5:30

शिवकुमार यांनी त्यांच्या आयुष्यात एक नियम काटेकोरपणे पाळला होता की एकदा मैफील संपली की पुन्हा संतूरला हात लावायचा नाही. पण..

Veteran lyricist Pandit Shivkumar Sharma had broken his own rules in Sangli | Shivkumar Sharma: ज्येष्ठ संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मांनी सांगलीत मोडला होता स्वत:चा नियम

Shivkumar Sharma: ज्येष्ठ संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मांनी सांगलीत मोडला होता स्वत:चा नियम

googlenewsNext

सांगली : हिंदुस्थानी संगीत विश्वातील ज्येष्ठ संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे व सांगलीकर रसिकांशी घट्ट नाते होते. सांगलीच्या अबकड कल्चरल ग्रुपच्या एका कार्यक्रमात शिवकुमार यांनी त्यांचा येथील रसिकांच्या रसिकतेला सलाम करीत स्वत:चाच नियम मोडला होता. त्यांच्या निधनानंतर येथील त्यांच्या आठवणींना रसिकांनी उजाळा देत आदरांजली वाहिली.

अबकड कल्चरल ग्रुपचा मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती संगीत महोत्सव १९९७ मध्ये झाला होता. ग्रुपचे अध्यक्ष शरद मगदुम यांनी पंडित शिवकुमार शर्मा यांना आमंत्रित केले होते. ज्यांना संगीतातल्या तांत्रिक बाबी समजत नाहीत, अशांना संतूरमधून प्रकटणाऱ्या नादमाधुर्याचा, भाव आणि नवरसांच्या उत्कट अभिव्यक्तीचा आस्वाद घेता येतो. त्यामुळे सांगलीतील अशा सर्व रसिकांनी त्यांच्या कार्यक्रमाला गर्दी केली होती. ते आले आणि त्यांनी संतूरवादनाला सुरुवात केली तसे सांगलीकर रसिक तल्लीन झाले होते. पंडितजींच्या संतुरातून बरसणाऱ्या स्वरधारांमध्ये रसिक चिंब भिजले. हा कार्यक्रम इतका रंगला की ही मैफील रात्री अडीच वाजता संपली.

अन् पुन्हा संतूर हाती घेतलं

शिवकुमार यांनी त्यांच्या आयुष्यात एक नियम काटेकोरपणे पाळला होता की एकदा मैफील संपली की पुन्हा संतूरला हात लावायचा नाही. सांगलीत रात्री अडीच वाजता कार्यक्रम संपल्यानंतरही प्रेक्षक उठले नाहीत. त्यांची तल्लीनता व भूक पाहून शिवकुमारही भारावले. त्यांनी या रसिकतेला मनातूनच सलाम करीत स्वत:चाच नियम मोडला आणि पुन्हा संतूर हाती घेतले. लोकाग्रहास्तव त्यांनी परत संतूरवादनाचा अर्धा तास कार्यक्रम केला होता, अशी आठवण शरद मगदुम यांनी सांगितली. त्यानंतर २००६ मध्ये त्यांचे पुत्र पंडित राहुल शर्मा यांनीही अबकड महोत्सवांमध्ये कला सादर केली होती.

कलाप्रेमींची आदराजंली

सांगलीच्या कलाप्रेमींच्या विविध सोशल मीडियावरील ग्रुपवर दिवसभर पंडित शिवकुमार शर्मा यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना आदरांजली वाहण्यात येत होती.

पंडित शिवकुमार शर्मा यांच्या निधनाने धक्का बसला. त्यांच्या संतूरवादनाच्या आठवणी आजही मनात ताज्या आहेत. अबकड कल्चरल ग्रुपच्यावतीने तसेच सांगलीकर रसिकांच्यावतीने त्यांना श्रद्धांजली. - शरद मगदुम, अध्यक्ष अबकड कल्चरल ग्रुप, सांगली

Web Title: Veteran lyricist Pandit Shivkumar Sharma had broken his own rules in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली