नशेसाठी प्रतिबंधित औषधाचा वापर वाढला; पोलिसांची कारवाई, मात्र औषध प्रशासनाचे दुर्लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 19:00 IST2025-07-14T19:00:16+5:302025-07-14T19:00:34+5:30
सदानंद औंधे मिरज : मिरजेत नशेसाठी वापर होणाऱ्या औषधी गोळ्या वारंवार पोलिस पकडत आहेत. या प्रतिबंधित औषधांवर औषधी विक्रीवर ...

नशेसाठी प्रतिबंधित औषधाचा वापर वाढला; पोलिसांची कारवाई, मात्र औषध प्रशासनाचे दुर्लक्ष
सदानंद औंधे
मिरज : मिरजेत नशेसाठी वापर होणाऱ्या औषधी गोळ्या वारंवार पोलिस पकडत आहेत. या प्रतिबंधित औषधांवर औषधी विक्रीवर नियंत्रणाचे अधिकार असलेल्या औषध प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष असल्याने नशेसाठी प्रतिबंधित औषधाचा वापर वाढत असल्याचे चित्र आहे.
दारू, गांजा, अमली पदार्थ, तंबाखूच्या पारंपरिक नशेसह आता गुंगी आणणाऱ्या औषधी गोळ्या व इंजेक्शनचा सर्रास वापर गेल्या काही वर्षांत सुरू झाला आहे. मिरजेत मानसोपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या नायट्रोजन या नशेच्या गोळ्याचा साठा गांधी चौक पोलिसांनी पकडला. या कारवाईत औषध दुकानदारही सापडत आहेत. नशेच्या गोळ्या, इंजेक्शन याचा वापर मिरजेत वाढत आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मिळणाऱ्या औषध दुकानात मिळणारी हे इंजेक्शन व गोळ्या गंभीर मानसिक आजार असणाऱ्या रुग्णांसाठी आहेत.
मात्र, ही प्रतिबंधित औषधे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय जादा किमतीने औषध दुकानात मिळतात. वैद्यकीय नगरी असलेल्या मिरजेत शेकडो औषध दुकाने असून, येथे सर्व प्रकारची प्रतिबंधित औषधे व इंजेक्शन उपलब्ध आहेत. अमली पदार्थ विक्रेत्यांनी त्याचा बाजार सुरू केल्याने याला अनेक तरुण बळी पडत आहेत. रुग्णांसाठी वापरायची प्रतिबंधित औषधे व इंजेक्शनचा वापर नशेसाठी सर्रास सुरू असल्याचे पोलिसांच्या कारवाईवरून दिसून आले आहे. मात्र, प्रतिबंधित औषधांच्या गैरवापराला आळा घालण्याची जबाबदारी असलेल्या औषध प्रशासनाचे याकडे सोयीस्कर दुर्लक्ष आहे.
मिरजेत पोलिसांनी यापूर्वीही नशेचे इंजेक्शन व नशेच्या गोळ्या मोठ्या संख्येने जप्त केल्या आहेत. मिरजेत नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या इंजेक्शनचा साठा जप्त करून त्याचा माग काढत उत्तर भारतातील औषध वितरकासही बेड्या ठोकल्या होत्या. मात्र, केवळ पोलिसांच्या कारवाईने औषधी गोळ्या व इंजेक्शनचा काळाबाजार बंद होणार नाही. त्यासाठी औषध प्रशासनाचेही कठोर नियंत्रण आवश्यक आहे. अमली पदार्थांवर कारवाईसाठी पालकमंत्र्यांनी मोहीम सुरू करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. आता इरळी येथे एमडी ड्रग्जचा कारखाना उघडकीस आल्याने सांगली, मिरजेसह जिल्ह्यात अमली पदार्थ विक्रीचे रॅकेट सक्रिय असल्याचे पुन्हा सिद्ध झाले.
नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्या-औषधे
पुढील औषधे उपचारासाठी वापरली जातात; पण त्यांचा नशेसाठी अवैध वापर सुरू आहे.
बेहोशी/गुंगी आणणाऱ्या गोळ्या (Sedatives/Tranquilizers)
Alprazolam Alprax, Restyl चिंतेवर उपचार; पण नशेसाठी वापरतात.
Diazepam Valium, Calmpose निद्रानाश, पण नशेसाठी वापरतात.
Lorazepam Ativan तणाव कमी करण्यासाठी, पण नशेसाठी वापरतात.
Clonazepam Rivotril चिंता व मिरगीसाठी, पण व्यसनासाठी वापर
निद्रासाधक गोळ्या (Sleep medications)
Zolpidem Stilnoct, Zolfresh झोपेसाठी, पण नशेकरिता वापरतात.
Nitrazepam Nitravet झोपेची गोळी, व्यसन निर्माण करते.
उत्तेजक औषधे (Stimulants)
Methylphenidate Concerta, Ritalin ADHD साठी, पण गैरवापरात उत्तेजनासाठी वापरतात.
Modafinil Modalert, Modvigil झोपेचा त्रास कमी करणे; पण मानसिक नशेसाठी वापरतात.
ओपिओइड्स (वेदनानाशक)
Tramadol Ultracet, Tramafin वेदनाशामक, पण नशेसाठी वापरतात.
Codeine Corex, Phensedyl सर्दी/खोकल्याचे औषध, पण नशेसाठी वापरतात.
Morphine Morphin Injection मोठ्या वेदनेत, पण व्यसनकारक
Buprenorphine Spasmoproxyvon व्यसनमुक्तीसाठी, पण नशेसाठी वापरतात.
ही सर्व औषधे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय देता येत नाहीत. नियमानुसार या औषधांच्या विक्रीचे रेकॉर्ड ठेवावे लागते. मात्र, औषध प्रशासनाकडून या औषध दुकानदारांच्या विक्री रेकॉर्डची तपासणी होत नसल्याने ही औषधे नशेसाठी बाजारात येत आहेत.