US-Israel-Iran war: दुबईत अडकले ३७ सांगलीकर; युद्धाच्या छायेतही सगळे सुरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 12:12 IST2026-03-03T12:08:28+5:302026-03-03T12:12:16+5:30

पर्यटकांसाठी निवास, अन्न व सुरक्षेची संपूर्ण व्यवस्था स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आली

US Israel Iran war A group of 29 people from Sangli district who went for tourism got stuck in Dubai | US-Israel-Iran war: दुबईत अडकले ३७ सांगलीकर; युद्धाच्या छायेतही सगळे सुरक्षित

US-Israel-Iran war: दुबईत अडकले ३७ सांगलीकर; युद्धाच्या छायेतही सगळे सुरक्षित

प्रसाद माळी

सांगली : इराण-इस्त्राईल-अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य तणावाचे पडसाद मध्यपूर्वेत उमटत असताना दुबईसह संयुक्त अरब अमिरातमध्येही सुरक्षेची कडक उपाययोजना करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील ३७ जणांचा पर्यटनासाठी गेलेला ग्रुप दुबईत अडकला असला, तरी सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. युएई सरकारने पर्यटक व परदेशी नागरिकांच्या सुरक्षेसाठी पुरेशी खबरदारी घेतल्याचे तेथील सांगलीकरांनी स्पष्ट केले आहे.

सांगलीतील एका ट्रॅव्हल्स एजन्सीमार्फत गेलेला ३७ जणांचा ग्रुप सध्या दुबईतच थांबलेला आहे. पुढील ४८ तासांसाठी विमानसेवा स्थगित करण्यात आल्याने त्यांचा परतीचा प्रवास लांबला आहे. तसेच दोन दिवसांची सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली असून, नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, पर्यटकांसाठी निवास, अन्न व सुरक्षेची संपूर्ण व्यवस्था स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

दरम्यान, मूळचे कसबेडिग्रज (ता. मिरज) येथील आणि सध्या अबुधाबीतील अलऐन भागात नर्स म्हणून कार्यरत असलेले आशिष देवकुळे यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना सांगितले की, “दि. २८ रोजी अबुधाबी परिसरावर काही मिसाईल आणि ड्रोन हल्ल्यांचे प्रयत्न झाले. मात्र, युएईची सुरक्षा यंत्रणा अत्यंत सक्षम असून बहुतांश हल्ले हवेतच निष्प्रभ करण्यात आले. किरकोळ हानी वगळता परिस्थिती नियंत्रणात आहे.”

देवकुळे यांनी सांगितले की, युएईमध्ये सुमारे १२ टक्के स्थानिक नागरिक असून उर्वरित ८८ टक्के लोक विविध देशांतून आलेले आहेत. सुमारे ४० लाखांहून अधिक भारतीय येथे वास्तव्यास आहेत. “सरकारकडून मोबाईल अलर्टद्वारे वेळोवेळी सूचना दिल्या जातात. मिसाईलचा इशारा मिळाल्यास सुरक्षित ठिकाणी थांबण्याचे संदेश येतात. १ मार्चपासून अबुधाबीतील जनजीवन हळूहळू सुरळीत होत आहे,” असे त्यांनी नमूद केले. सांगलीतील सुमारे ६० हून अधिक जण वैद्यकीय क्षेत्रात येथे कार्यरत असून सर्वजण परस्पर संपर्कात आहेत.

“सांगलीतील २९ जणांचा ग्रुप दुबईमध्ये अडकला आहे; मात्र ते पूर्णपणे सुरक्षित आहेत. भारतीय दूतावास व दुबई विमानतळ प्रशासनाच्या सूचनांनुसार सध्या जिथे आहेत तिथेच थांबण्याचे त्यांना सांगितले आहे.” - मुंकुद माने, खजिनदार, टूर ऑपरेटर असोसिएशन, सांगली.
 

दुबई येथील स्थिती नियंत्रणात आहे. युएई सरकार सर्व ती खबरदारी घेत आहे. समाज माध्यमांवर अफवा पसरवल्या जात आहेत; त्यावर विश्वास ठेवू नका. आम्ही सर्व सुरक्षित आहोत.” - आशिष देवकुळे, अबुधाबी (मूळ रा. कसबेडिग्रज, ता. मिरज)

Web Title : अमेरिका-इज़राइल-ईरान तनाव के बीच दुबई में फंसे सांगली के पर्यटक, सुरक्षित

Web Summary : अमेरिका-इज़राइल-ईरान तनाव के चलते सांगली के 29 पर्यटक दुबई में फंसे हैं। उड़ानें निलंबित हैं, लेकिन वे सुरक्षित हैं। यूएई अधिकारी आवास, भोजन और सुरक्षा प्रदान कर रहे हैं। अबू धाबी के पास मिसाइल खतरों को निष्क्रिय कर दिया गया, स्थिति नियंत्रण में है।

Web Title : Sangli Tourists Stranded in Dubai Amid US-Israel-Iran Tension, Safe

Web Summary : 29 tourists from Sangli are stuck in Dubai due to US-Israel-Iran tensions. Flights are suspended, but they are safe. UAE authorities provide accommodation, food, and security. Missile threats near Abu Dhabi were neutralized, situation controlled.