रेल्वेच्या तिकिटावरून ‘यूपी’तील महिलेच्या खुनाचा छडा लागला, पती-सासऱ्याला अटक, धक्कादाक कारण समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 19:09 IST2026-01-04T18:59:19+5:302026-01-04T19:09:30+5:30
Sangli Crime News: बोलवाड (ता. मिरज) येथे कुजलेल्या अवस्थेत सापडलेल्या महिलेच्या खुनाचे रहस्य स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने रेल्वेच्या तिकिटावरून उलगडले.

रेल्वेच्या तिकिटावरून ‘यूपी’तील महिलेच्या खुनाचा छडा लागला, पती-सासऱ्याला अटक, धक्कादाक कारण समोर
सांगली : बोलवाड (ता. मिरज) येथे कुजलेल्या अवस्थेत सापडलेल्या महिलेच्या खुनाचे रहस्य स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने रेल्वेच्या तिकिटावरून उलगडले. मृत महिलेचे नाव नितू ऊर्फ शालिनी आकाश यादव (वय ३५) असे असून, ती उत्तर प्रदेशातील आहे. तिचा दुसरा पती आकाश ऊर्फ विशाल दीनदयाळ यादव (२४) आणि सासरा दीनदयाळ रामबाली यादव (५५, दोघेही रा. खुज्झी, ठाणा चंन्दवक, जि. जौनपूर, उत्तर प्रदेश) या दोघांनी चारित्र्याचा संशय, पोलिसात दिलेल्या तक्रारीमुळे तिला इकडे आणून खून केल्याचे तपासात स्पष्ट झाले.
पोलिस अधीक्षक संदीप घुगे म्हणाले, बोलवाड येथे दि. २३ डिसेंबर २०२५ रोजी कुमार पाटील यांच्या उसाच्या शेतात एका महिलेचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाचा डोक्याकडील भाग प्राण्यांनी खाल्ल्याने आणि तो कुजलेल्या अवस्थेत असल्याने ओळख पटली नाही. मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद झाली. पुरावे काहीच नसल्याने पोलिसांसमोर तपासाचे आव्हान होते. त्यामुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे समांतर तपास दिला. गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असताना घटनास्थळाजवळ पुणे ते मिरज दरम्यानचे रेल्वे तिकीट सापडले. त्यामुळे तिकिटावरून तपास सुरू झाला. तिकीट दि. १६ डिसेंबर २०२५ रोजी पुणे रेल्वे स्थानकावर काढल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी मिरज रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. मृत महिलेच्या अंगावरील साडी आणि शाल पांघरलेल्या महिलेसोबत दोन पुरुष सीसीटीव्हीत दिसले. फुटेज पोलिसांनी स्थानिक दुकानदार, रिक्षाचालक, फेरीवाले व हमालांना दाखविले. रेल्वे स्थानकावरील एका चिक्की विक्रेत्याने महिला आणि दोन पुरुषांना ओळखले. तिघांकडे पैसे नसल्याने एकाने नातेवाइकांकडून ऑनलाइन तीन हजार माझ्यामार्फत मागवून घेतल्याचे सांगितले. एका रिक्षाचालकाने तिघांना टाकळी गावाजवळील ओढ्याजवळ सोडल्याचे सांगितले.
अधीक्षक घुगे पुढे म्हणाले, गुन्हे अन्वेषणच्या तांत्रिक तपासात दोन संशयित मोबाइल क्रमांक निष्पन्न झाले. ते जौनपूर जिल्ह्यातील असल्याचे समजले. त्यामुळे पोलिस पथके उत्तर प्रदेश व हरियाणा येथे रवाना झाली. सीसीटीव्हीतील दोघेजण आकाश ऊर्फ विशाल यादव आणि दीनदयाल यादव असल्याचे समजले. कसून तपास केल्यानंतर मृत महिला नीतू हिचे आकाश यादवशी दुसरे लग्न झाले होते. लग्नानंतर त्यांच्यात सतत वाद सुरू होते. तसेच तिने पहिले लग्न लपवून ठेवल्याचे आकाशला समजले. सासरी वाद होत असल्याने ती सतत माहेरी जात होती. त्यामुळे चारित्र्याबाबत आकाशला संशय होता. कौटुंबिक वादातून तिने पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यामुळे तिचा काटा काढण्याचे ठरवले. आकाश आणि दीनदयाळ यांनी नीतू हिला दुसरीकडे राहण्यास जायचे असल्याचे सांगून उत्तर प्रदेश येथील मिर्झापूर रेल्वे स्थानकावर आले. तेथून पुण्याला आणले. दि. १६ डिसेंबरला तिघे मिरजेत उतरले. सायंकाळी टाकळीजवळील उसाच्या शेतात शालीने गळा आवळून नीतूचा खून केला. मृतदेह शेतात टाकून बापलेक मिरजेतून उत्तर प्रदेशकडे पसार झाले. आठ दिवसांत याचा छडा लावला. यावेळी अप्पर अधीक्षक कल्पना बारवकर, गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक संजीव झाडे उपस्थित होते.
कट रचून खून केला
दीनदयाळ याने मालगाव येथील म्हशीच्या गोठ्यात पूर्वी काम केले होते. परिसराची त्याला माहिती होती. युपीतून महाराष्ट्रात येऊन खून केला तर तो तत्काळ उघडकीस येणार नाही याची खबरदारी घेतली होती. परंतु, तिकिटावरून खुनाचा प्रवास उलगडला.
पथकाचा कसून तपास
उपअधीक्षक प्रणील गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक झाडे, निरीक्षक अजित सिद, सहायक निरीक्षक रणजित तिप्पे, उपनिरीक्षक कुमार पाटील, महादेव पोवार, अंमलदार इम्रान मु्ला, संकेत मगदूम, प्रमोद साखरपे, सुशील मस्के, श्रीधर बागडी, रूपेश होळकर, सुमित सूर्यवंशी, अतुल माने, रणजित जाधव, गणेश शिंदे, सुनील देशमुख, अभिजित पाटील, अजय पाटील यांच्या पथकाने कसून तपास केला.
परप्रांतात जाऊन तळ ठोकला
पोलिस पथकाने हरियाणा येथून पती आकाश यादव, तर उत्तर प्रदेशातील खुज्झी येथून सासरा दीनदयाळ यादव याला जेरबंद केले. कसून तपास केल्यानंतर त्यांनी कबुली दिली. काही दिवस पथक हरियाणा, उत्तर प्रदेशात तळ ठोकून होते.