सांगलीचा ‘माझ्या गावचा धडा’ राज्यासाठी पथदर्शी प्रयोग, जिल्हा परिषदेचा उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 17:32 IST2025-04-15T17:32:17+5:302025-04-15T17:32:40+5:30
शिक्षकांनी लिहिले ७०० गावांतील २ हजार २६३ धडे

सांगलीचा ‘माझ्या गावचा धडा’ राज्यासाठी पथदर्शी प्रयोग, जिल्हा परिषदेचा उपक्रम
सांगलीजिल्हा परिषदेने प्राथमिक शालेय मुलांना अभ्यासक्रमातील विषय, संकल्पना पटकन समजण्यासाठी ‘माझ्या गावचा धडा’ हा उपक्रम राबविला आहे. सांगलीजिल्हा परिषदेचा हा प्रयोग राज्यासाठी पथदर्शी म्हणून आळखला जात आहे. या प्रयोगामागील भूमिका व संकल्पनेविषयी मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याशी ‘लोकमत’ने साधलला संवाद..
प्रसाद माळी
सांगली : जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या ‘माझ्या गावचा धडा’या उपक्रमांतर्गत शिक्षकांनी ७०० गावांतील २ हजार २६३ धडे लिहिले आहेत. स्थानिक इतिहास, भूगोल, संस्कृती, परंपरा, विशेष व्यक्तीची माहिती या धड्यांमध्ये आहेत. पहिली ते आठवी इयत्तेमध्ये पाठ्यपुस्तकातून हे धडे शिकवले जाणार आहेत. यातून मुलांची आपल्या परिसराविषयीची संकल्पना, समज अधिक सुस्पष्ट होण्यास मदत होणार आहे. हा राज्यातील इतर जिल्ह्यांसाठी पथदर्शी प्रयोग ठरणार आहे, असा विश्वास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी व्यक्त केला.
प्राथमिक शिक्षणातील अभ्यासक्रमांमध्ये विषय शिकवताना त्यातील गोष्टी व उदाहरणे हे दुसऱ्या जिल्ह्यातील किंवा राज्यातील असतात. ते परिचयातील नसल्यामुळे त्या संकल्पना मुलांना स्पष्ट होत नाहीत. ही अडचण दूर करण्यासाठी अभ्यासक्रमातील उदाहरणे, स्थानिक गोष्टी त्यांच्या गावातील असतील, तर ते त्यांना लगेच समजेल. या धड्यांमधून मुलांना त्यांचा परिसर, भूगोल, प्रसिद्ध ठिकाण, प्रसिद्ध व्यक्ती, संस्कृती, परंपरा, वेशभूषा यांची माहिती होईल. जे ते दररोज पाहतात व अनुभवतात त्याच्या उदाहरण व गोष्टीतून शालेय संकल्पना त्यांना पटकन समजतील. या उद्देशाने हा उपक्रम पुढे आल्याचे तृप्ती धोडमिसे यांनी सांगितले.
धोडमिसे म्हणाल्या, शिक्षकांनी २ हजार २६३ धड्यांच्या माध्यमातून आतापर्यंत माहिती नसणाऱ्या स्थानिक गोष्टी पुस्तकात आणल्या आहेत. नदी, ओढा, डोंगर, मंदिरे, तलावे, धबधबे, पठारे, स्थानिक संस्कृती, उत्सव, परंपरा, खेळ, पदार्थ, दागिने यांची माहिती व इतिहास जे कधीही पुस्तकात नव्हते. त्यांचा समावेश केला आहे. यातून मुलांच्या अभ्यासातील संकल्पना स्पष्ट होतील, त्या अनुभवता येतील. यातून विद्यार्थ्यांची अभ्यासातील गोडी वाढेल. या उपक्रमाच्या माध्यमातून शिक्षकही लिहिते झाले. त्यांनी कथा, कविता, वर्णनात्मक लेखातून या सर्व गोष्टी पुस्तकात आणल्या. यातून एक स्थानिक साहित्य निर्माण झाले आहे.
तालुकानिहाय धड्यांची संख्या..
शिराळा : १४७, वाळवा : ८५, खानापूर ८६, मिरज : १२७, जत : (मराठी) २५६, (कन्नड) ११२, कडेगाव ९६, पलूस ६५, आटपाडी : ८७, कवठेमहांकाळ : ८०, तासगाव १०२.
मुलांची शिक्षणातील आवड वाढावी, संकल्पना पटकन समजाव्यात, त्यांची समज त्यातून तयार व्हावी, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. आम्ही पुढील टप्प्यात राज्य शैक्षणिक व प्रशिक्षण संस्थेस विनंती करणार आहोत की, शालेय पाठ्यपुस्तकात काही पाने रिकामे ठेवावीत. ज्यामध्ये तेथील स्थानिक धड्यांचा समावेश करता येतील. त्याद्वारे स्थानिक गोष्टींच्या आधाराने शिक्षकांना मुलांना शिकवता येईल व ते मुलांनाही अधिक सुस्पष्ट समजेल. - तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सांगली.