कुकरीने दहशत माजवत दोघांवर खुनी हल्ला; जखमींवर उपचार सुरु, सांगलीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 12:17 IST2026-03-14T12:17:18+5:302026-03-14T12:17:39+5:30
सांगली : गावभागातील मुख्य रस्त्यावर शुक्रवारी रात्री कुकरीने दहशत माजवत खुनी हल्ला करण्यात आला. हल्ल्यात होमेंद्र राजेंद्र भोसेकर (२४, ...

संग्रहित छाया
सांगली : गावभागातील मुख्य रस्त्यावर शुक्रवारी रात्री कुकरीने दहशत माजवत खुनी हल्ला करण्यात आला. हल्ल्यात होमेंद्र राजेंद्र भोसेकर (२४, रा. मीरा हौसिंग सोसायटी) आणि रशीद राजासाब मुल्ला (२३, रा. राणाप्रताप चौक, सांगली) हे दोघे गंभीर झाले आहेत. त्यांच्यावर सिव्हिल रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. पूर्वीच्या वादातून हा हल्ला झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, होमेंद्र भोसेकर हा एका मोबाइलच्या सिम कार्ड कंपनीत नोकरीस आहे. तेथे काम करणाऱ्याबरोबर त्याचा वाद झाला होता. वाद पोलिस ठाण्यापर्यंत गेला होता. शुक्रवारी काम संपल्यानंतर भोसेकर हा गावभागातून निघाला होता.
मारुती चौकाजवळ तो थांबला. त्या ठिकाणी काहीजण आले होते. त्यांच्यात वाद झाला. यावेळी कुकरी काढून दहशत माजवण्यात आली. वाद मिटवण्यासाठी रशीद तेथे गेला होता; मात्र त्याच्यावरही हल्ला करण्यात आला. यावेळी भोसेकर याच्या डोक्यात, हातावर, मानेवर वार झाले.
हल्ल्यानंतर परिसरात मोठी गर्दी होती. शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अरुण सुगांवकर यांनी तातडीने गुन्हे प्रकटीकरण शाखेला पाठवले. जखमींना सिव्हिलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली नव्हती.