Sangli Accident News: आईसमोर लेकीने सोडले प्राण; दुचाकींच्या धडकेत दोन ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 13:20 IST2025-10-25T13:18:52+5:302025-10-25T13:20:40+5:30
अपघातात डोळ्यादेखत मुलीने प्राण सोडल्याने जखमी आईला धक्का बसला

Sangli Accident News: आईसमोर लेकीने सोडले प्राण; दुचाकींच्या धडकेत दोन ठार
विटा : बलवडी (भा.) येथून विट्याकडे येणाऱ्या व विट्याहून आळसंदकडे निघालेल्या दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन दोन ठार झाले. अपघातात डोळ्यादेखत मुलीने प्राण सोडल्याने जखमी आईला धक्का बसला. महेश्वरी आनंदा पाटील (वय २५, रा. मायाक्कानगर, विटा) असे मृत मुलीचे नाव असून दुसऱ्या दुचाकीवरील विनायक दादासाहेब पाटील (वय ३५, रा. बलवडी-भा.) या तरुणाचाही मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास अपघात झाला.
विटा येथील महेश्वरी पाटील व त्यांच्या आई अनिता भगत या दोघी दुचाकीवरून (क्र. एमएच १०, ईएन ४२८५) विट्याहून आळसंदकडे नातेवाइकांना भेटण्यासाठी निघाल्या होत्या, तर बलवडी (भा.) येथील विनायक पाटील हे दुचाकीवरून (एमएच १२, सीएस १८६४) आळसंदहून विट्याकडे निघाले होते. त्यावेळी चक्रधारी सूतगिरणीजवळ या दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक झाली.
अपघातात दुचाकीवरील महेश्वरी पाटील व दुसऱ्या दुचाकीवरील विनायक पाटील हे गंभीर जखमी झाले, तर महेश्वरी यांची आई अनिता भगत या किरकोळ जखमी झाल्या. अपघातानंतर स्थानिकांनी जखमी तिघांना तातडीने विट्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु, महेश्वरी पाटील व विनायक पाटील यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या अपघातात दोन्ही दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच विटा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी व रुग्णालयात धाव घेतली. या अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेले विनायक पाटील यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे. अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याने विटा व बलवडी (भा.) परिसरावर शोककळा पसरली आहे.