Sangli: उसाच्या ट्रॅक्टरला पाठीमागून दुचाकीची धडक, दोघे ठार; पेठ शिराळा राज्यमार्गावर रेठरे धरणजवळ अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 18:52 IST2026-01-30T18:52:44+5:302026-01-30T18:52:56+5:30
दोन्ही युवकांचे मृतदेह शवविच्छेदन करून सकाळी नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले

Sangli: उसाच्या ट्रॅक्टरला पाठीमागून दुचाकीची धडक, दोघे ठार; पेठ शिराळा राज्यमार्गावर रेठरे धरणजवळ अपघात
रेठरे धरण : पेठ शिराळा राज्यमार्गावर रेठरे धरण (ता. वाळवा) तलावाच्या उतारावर दुचाकीने उसाच्या ट्रॉलीला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात शिराळा येथील दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास घडली. या अपघातात पवन सुरेश कदम (वय २५, रा. कदमवाडी, ता. शिराळा) व अभिषेक अमर परदेशी (वय २४, रा. शिराळा) यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, बुधवारी रात्री पेठकडून शिराळाच्या दिशेने दुचाकीवरून (एमएच १० ईएस ९४४०) वेगात निघालेले हे दोघे युवक रेठरे धरण (ता. वाळवा) येथील तलावाजवळ आल्यावर शिराळाकडे चाललेल्या उसाच्या ट्रॉलीला (एमएच ०९ ईव्ही ९४३०) पाठीमागील बाजूस जोरात धडकले.
या अपघातात दोन्ही युवकांच्या डोक्याला गंभीर मार लागून रक्तस्राव झाल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघात रात्री उशिरा झाल्याने घटनास्थळी काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. घटनेची नोंद इस्लामपूर पोलिसात झाली असून, रात्री उशिरा दोन्ही युवकांचे मृतदेह शवविच्छेदन करून सकाळी नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.
त्याच मार्गावर आणखी एक अपघात
त्याच पेठ शिराळा मार्गावर बुधवारी रात्री नऊ वाजता आणखी एक अपघात घडला. पेठ शाळेजवळ शिराळाकडे दुचाकीवरून सूरज भीमराव घेवदे (वय २५, रा. रेठरे धरण) निघाले होते. त्यांना दुसऱ्या दुचाकीने डॅश देऊन ती पुढे निघून गेली. दुसऱ्या दुचाकीने दिलेल्या धक्क्यामुळे सूरज दुचाकीवरून रस्त्यावर पडले. त्यावेळी त्यांच्या पाठीमागून येणाऱ्या ट्रकचे चाक सूरज यांच्या पायावरून गेले. या अपघातात सूरज गंभीर जखमी झाले असून ईश्वरपूर येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र या अपघाताबाबत पोलिसांमध्ये अद्याप नोंद झाली नाही.