सांगलीत वर्चस्व वादातून दोघांवर हल्ला; एकजण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 13:00 IST2025-10-28T12:59:28+5:302025-10-28T13:00:02+5:30
शामरावनगर परिसरात गुन्हेगारीत वाढ

सांगलीत वर्चस्व वादातून दोघांवर हल्ला; एकजण गंभीर जखमी
सांगली : शहरातील शामराव नगरमधील स्वराज्य चौकात दोन गटांत वर्चस्वातून वाद उफाळून आला. सोमवारी रात्री नऊच्या सुमारास दोघा तरुणांवर काठीने आणि हत्याराने हल्ला करण्यात आला. यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्यात गंभीर दुखापत झाली आहे. त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले आहे. सांगली शहर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद झाला नव्हता.
घटनास्थळी मिळालेली माहिती अशी, शामराव नगरमधील स्वराज्य चौकात सोमवारी बाजार भरला होता. रात्री नऊच्या सुमारास वर्चस्ववादातून दोन तरुणांना काठ्यांसह धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. त्यामुळे परिसरातील लोकांची पळापळ झाली. हल्ल्यामध्ये एकाच्या डोक्यात वर्मी वार झाल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. दुसऱ्या तरुणाच्या छातीवर मारहाण झाली. दोघे जखमी झाल्यानंतर हल्लेखोर पळाले.
त्यानंतर तातडीने भागातील नागरिकांनी जखमींना सिव्हिलमध्ये उपचारासाठी दाखल केले. हल्ल्याची माहिती मिळताच सांगली शहर पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक महादेव पोवार यांच्या पथकाने हल्लेखोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. हल्ल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण होते. अनेकांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. त्यामुळे मोठी गर्दी झाली होती.
शामरावनगर परिसरात गुन्हेगारीत वाढ
शामरावनगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढली आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी नशेखोरांसह परिसरातील गुन्हेगारीचा बीमोड करावा, अशी मागणी होत आहे.