Sangli flood: सांगलीत बायपास रस्त्यावर वाहनांच्या रांगा, वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिस तैनात
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 19:24 IST2025-08-22T19:24:16+5:302025-08-22T19:24:31+5:30
इस्लामपूर, पलूसकडे जाण्यासाठी देखील हाच महत्त्वाचा रस्ता

छाया-नंदकिशोर वाघमारे
सांगली : कृष्णेला आलेल्या पुरामुळे सांगली ते कर्नाळ रस्ता, जुना बुधगाव रस्ता, बायपास ते सर्किट हाऊस रस्ता पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे इस्लामपूर, पलूसकडून येणारी हजारो वाहने बायपासमार्गे सांगलीत येत आहेत. तसेच जाण्यासाठी देखील हाच मार्ग असल्यामुळे बायपास रस्त्यावर गुरुवारी दिवसभर ‘ट्रॅफिक जाम’ चा अनुभव आला. वाहतूक पोलिसांनी दिवसभर तसेच रात्रीपर्यंत कसरत करावी लागली.
कर्नाळ रस्ता, जुना बुधगाव रस्ता, सर्किट हाऊस रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे इस्लामपूर, पलूसहून सांगलीत येणाऱ्या मोठ्या वाहनांना बायपासमार्गे सांगलीत यावे लागत आहेत. या रस्त्याने कॉलेज कॉर्नरमार्गे जावे लागत असल्यामुळे गुरुवारी सकाळपासून या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी दिसून आली. तसेच इस्लामपूर, पलूसकडे जाण्यासाठी देखील हाच महत्त्वाचा रस्ता असल्यामुळे या रस्त्यावर वाहनांच्या दूरवर रांगा लागल्याचे चित्र दिसले.
बायपासवर वर्दळ वाढल्यामुळे सांगली ते माधवनगर रस्त्यावरील वाहनांना ये-जा करताना अडथळ्यांचा सामना करावा लागला. दुपारचा अपवाद वगळता सकाळी आणि सायंकाळी बायपासवर वाहनांची रांग लागली होती. रात्री उशिरापर्यंत वाहनांची वर्दळ दिसून आली. बायपास रस्त्यावर वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांना १२ पॉईंट देण्यात आले आहेत. तेथे सकाळपासून रात्री वाहतूक पोलिस तैनात असल्याचे दिसून आले.