Sangli: उतारावर ट्रॅक्टरवरील ताबा सुटला, चरणमध्ये ट्रॅक्टर उलटून चालकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 19:22 IST2025-11-15T19:21:38+5:302025-11-15T19:22:59+5:30
आई-वडिलांचा व नातेवाइकांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे हृदय हेलावून गेले

Sangli: उतारावर ट्रॅक्टरवरील ताबा सुटला, चरणमध्ये ट्रॅक्टर उलटून चालकाचा मृत्यू
चरण : उतारावर ट्रॅक्टरवरील ताबा सुटून ट्रॅक्टर उलटल्याने चालकाचा मृत्यू झाला. चरण (ता. शिराळा) येथील अमन हमीद नायकवाडी (वय २४) असे मृताचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की, अमन नायकवाडी हा ट्रॅक्टरमध्ये भात काढणी व मळणी मशीन घेऊन दिवसभर गावातील भातशिवारात काढणीचे काम करत होता. गुरुवारी संध्याकाळी सातच्या सुमारास चरणवाडीच्या शिवारातील मांजरखिंडीच्या उतारावर ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने ट्रॅक्टर उलटला व अमन त्या खाली दबल्यामुळे गंभीर जखमी झाला. ट्रॅक्टरच्या ट्रॉलीतील मळणी मशीनदेखील पलटी झाली.
घटनास्थळी लोक जमा झाल्यानंतर दुसऱ्या ट्रॅक्टरच्या मदतीने अमनाला बाहेर काढून तात्काळ कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलविले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. त्याच्यासोबत असलेला तरुण किरकोळ जखमी झाला आहे.
अमन हा चरणचे माजी उपसरपंच हमीद नायकवाडी यांचा मुलगा असून त्याच्या निधनाने गावात शोककळा पसरली आहे. भाजपा आमदार सत्यजित देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक, युवा नेते विराज नाईक, माजी सभापती हणमंतराव पाटील, माजी उपसभापती बी. के. नायकवाडी यांनी अमन यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. अमनच्या आई-वडिलांचा व नातेवाइकांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे हृदय हेलावून गेले.