Sangli: घाणंद येथे जमीन वादातून कुऱ्हाड, काठीने मारामारी, महिलेसह तिघे जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 15:39 IST2025-08-09T15:38:48+5:302025-08-09T15:39:09+5:30
दोन परस्परविरोधी गुन्हे दाखल

संग्रहित छाया
आटपाडी : घाणंद (ता. आटपाडी) गावात ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी दोन कुटुंबांमध्ये शेतजमिनीच्या मालकी व वापर हक्कावरून मोठा वाद झाला. या वादाचे मारामारीत रूपांतर झाले. दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध फिर्याद दिल्याने आटपाडी पोलिस ठाण्यात दोन्ही बाजूविरुद्ध दोन परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत.
आटपाडी पोलिस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार, बबन शिंदे (वय ६५, रा. घाणंद) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी बबन शिंदे आपल्या शेतात असताना गावातील पांडुरंग जयसिंग शिंदे, नारायण शिंदे, सर्जेराव माने आणि हेमलता शिंदे यांनी त्यांना शिवीगाळ केली आणि हाताने मारहाण केली. या घटनेत बबन शिंदे यांना दुखापत झाली. या प्रकरणी बीएनएस कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
त्याच घटनेच्या संदर्भात, सर्जेराव जयसिंग शिंदे (वय ४५, रा. घाणंद) यांनी दुसरी बाजू मांडत पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार, ६ ऑगस्ट रोजी त्यांच्या शेताजवळील आर.के. मंगल कार्यालयाच्या बाजूच्या पडीक शेतजमिनीवर बबन शिंदे यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या शेळ्या भाडेपट्टीतील शेतात सोडल्याने वाद झाला. विचारणा केल्यावर, सागर बबन शिंदे आणि संदेश बबन शिंदे यांनी शिवीगाळ करत हल्ला चढवला. सागर शिंदेने कुऱ्हाडीने सर्जेराव यांच्यावर वार केला. सर्जेराव नंतर घरी गेले आणि पत्नी, मुलगा व मुलगी घेऊन घटनास्थळी परत आले. तेव्हा छाया बबन शिंदे हिने मारहाण केली, तर संदेशने सर्जेराव यांच्या पत्नीला आणि मुलगी सोनालीच्या डोक्यावर काठीने प्रहार केला. या घटनेत तीनजण जखमी झाले.
या प्रकरणी बीएनएस कलम १२६(२), ११५(२), १३१, ३५२, ३५१(२), ३५१(३), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. जखमींना वैद्यकीय तपासणीसाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घाणंद गावात या घटनेनंतर काहीसा तणाव निर्माण झाला असून, पोलिस बंदोबस्त आहे.