Sangli: चालकाचा ताबा सुटल्याने कार दुभाजकाला धडकली, कोल्हापूरचे तिघे जागीच ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2024 19:46 IST2024-02-19T19:45:43+5:302024-02-19T19:46:50+5:30
कवठेमहांकाळ : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर शिरढोण (ता. कवठेमहांकाळ) येथील उड्डाणपुलावर चारचाकी वाहन दुभाजकावर जोरदार आदळले. या अपघातात तिघांचा जागीच ...

Sangli: चालकाचा ताबा सुटल्याने कार दुभाजकाला धडकली, कोल्हापूरचे तिघे जागीच ठार
कवठेमहांकाळ : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर शिरढोण (ता. कवठेमहांकाळ) येथील उड्डाणपुलावर चारचाकी वाहन दुभाजकावर जोरदार आदळले. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर आणखी एकजण गंभीर जखमी झाला.
सूर्यकांत दगडू जाधव (वय ५२), गौरी विनायक जाधव (३५) व युवराज विजय जाधव (३२, सर्व रा. हेड पोस्ट ऑफिस, रमणमळा, कोल्हापूर), अशी अपघातातमृत्यू झालेल्यांची नावे आहेत तर प्रशांत पांडुरंग चिले (४०, रामानंदनगर, कोल्हापूर) हे गंभीर जखमी आहेत. हा अपघात सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास झाला.
कवठेमहांकाळ पोलिसांत अपघाताची नोंद झाली आहे. कोल्हापूर येथील जाधव कुटुंब सूर्यकांत जाधव, गौरी जाधव, युवराज जाधव व प्रशांत चिले हे पंढरपूर येथे देवदर्शनासाठी गेले होते. पंढरपूरहून ते कोल्हापूरला चारचाकी गाडीतून (एमएच ०९ जीएफ ८३२३) येत असताना कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोण गावच्या हद्दीत आले असताना चालकाचा ताबा सुटल्याने चारचाकी वाहन उड्डाणपुलावरील दुभाजकावर जाऊन जोरदार आदळले.
यामध्ये जाधव कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर प्रशांत चिले हे गंभीर जखमी झाले. त्यांना मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले तर मृत्यू झालेल्यांचे कवठेमहांकाळ येथे उपजिल्हा रुग्णालयात सोमवारी रात्री उशिरा शवविच्छेदन करण्याचे काम सुरू होते.
शिरढोण येथे झालेल्या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलिस व कवठेमहांकाळ पोलिस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. जखमीला तत्काळ मिरज येथे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या अपघाताच्या घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर करीत आहेत.
रमणमळा, रामानंदनगरवर शोककळा
कोल्हापुरातील रमणमळा येथील सूर्यकांत जाधव हे हॉटेल व्यावसायिक होते. राजारामपुरी येथील अन्नपूर्णा हॉटेल ते स्वत: चालवत होते, तर कोगनोळी टोलनाका येथील हॉटेल त्यांनी मुलाकडे सोपवले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई असा परिवार आहे. रामानंदनगर येथील युवराज जाधव हे सराफ व्यावसायिक होते. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी पाचगावमध्ये नवीन बंगला खरेदी केला. गौरी विनायक जाधव या चुलत बहिणीला सोबत घेऊन ते सूर्यकांत जाधव आणि प्रशांत चिले यांच्यासोबत रविवारी सायंकाळी पंढरपूरला गेले होते. चिले हे गंभीर जखमी असून, ते खासगी कंपनीत काम करतात. सूर्यकांत जाधव, युवराज जाधव आणि गौरी जाधव यांच्या अपघाती मृत्यूमुळे रमणमळा आणि रामानंदनगर परिसरात शोककळा पसरली.