Sangli Crime: शीतपेयातून गुंगीचे औषध पाजून ‘वैद्यकीय’च्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 13:29 IST2025-05-22T13:29:30+5:302025-05-22T13:29:49+5:30
तिघांना अटक

Sangli Crime: शीतपेयातून गुंगीचे औषध पाजून ‘वैद्यकीय’च्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार
सांगली : सांगलीत वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केला. मंगळवारी रात्री वान्लेसवाडी येथे ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी विद्यार्थिनीच्या दोन सहअध्यायींसह तिघांना अटक केली आहे. तरुणीला शीतपेयातून गुंगीचे द्रव पाजून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. वान्लेसवाडीत वर्गमित्राच्या सदनिकेत बलात्कार करण्यात आला.
विनय विश्वेश पाटील (वय २२, रा. महिपती निवास, अंतरोळीकर नगर, भाग १ सोलापूर), सर्वज्ञ संतोष गायकवाड (२०, रा. एफ. ६०५, सरगम, नांदेड सिटी, सिंहगड रस्ता, पुणे) आणि तन्मय सुकुमार पेडणेकर (२१, रा. ३०३ कासाली व्हिला, अभयनगर, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पीडित तरुणी बेळगाव जिल्ह्यातील आहे. सांगलीत एका वैद्यकीय महाविद्यालयात ती शिक्षण घेते. संशयित विनय आणि सर्वज्ञ तिच्याच सोबत महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. तन्मय हा या दोघांचा मित्र आहे. मंगळवारी (दि. २०) रात्री तिघांनी तिला चित्रपट पाहण्यासाठी म्हणून दुचाकीवरून वान्लेसवाडी येथील सदनिकेत नेले. तेथे तिला गुंगीचे द्रव घातलेले शीतपेय पाजले. ती गुंगीत गेल्यावर तिघांनी तिच्यावर बलात्कार केला.
मध्यरात्री दिली फिर्याद
काही वेळाने तरुणी शुद्धीवर आल्यानंतर तिने स्वतःची सुटका करून घेतली. मध्यरात्री थेट विश्रामबाग पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. अपर पोलिस अधीक्षक रितू खोखर, निरीक्षक सुधीर भालेराव यांनी तातडीने कारवाईची पावले उचलली. तिघांना काही वेळातच जेरबंद केले.