Sangli: चोरट्यांनी सोन्या-दागिन्यांवर नव्हे, तर..; पोलिसांकडून गुन्हा नोंद करण्यास टाळाटाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 17:16 IST2024-12-30T17:15:49+5:302024-12-30T17:16:23+5:30
टोळीस पकडण्यात मात्र पोलिसांना अपयश

संग्रहित छाया
माडग्याळ : माडग्याळ (ता. जत) येथे शुक्रवारी दिवसाढवळ्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील दागिने लुटण्यात आले, तर रात्रीच्या वेळी गावानजीकच वस्तीवरील दोन जनावरांची चोरी करण्यात आली. याबाबत उमदी पोलिस ठाण्यात मात्र कोणतीच नोंद रात्री उशिरापर्यंत झाली नव्हती.
माडग्याळ येथे शुक्रवारी मुलीला भेटण्यास आलेली वृद्ध महिला गोदाबाई काटकर (वय ६०, रा. गुदवान, ता. इंडी, जि. विजयपूर, कर्नाटक) या सनमडी रस्त्याने मुलीच्या घरी चालत जात असताना एका अज्ञात व्यक्तीने पाठलाग करत त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसका मारून वृद्ध महिलेस ढकलून पळ काढला. आठवडा बाजारादिवशीच घडलेल्या या घटनेने माडग्याळमध्ये घबराटीचे वातावरण होते.
दुपारची चेन स्नॅचिंगची घटना घडलेली असतानाच त्याच रात्री परशुराम दुंडाप्पा माळी यांच्या घरासमोरील दोन गायी चोरीला गेल्या. जनावर चोरीच्या घटना वारंवार घडत असून आतापर्यंत या टोळीस पकडण्यात मात्र पोलिसांना अपयश आले आहे.
गुन्हा नोंद करण्यास टाळाटाळ
माडग्याळ येथे जनावरांच्या चोरीच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे, पोलिसांकडून मात्र अशा चोरींचे प्रकरण नोंद करण्यास टाळाटाळ होताना दिसत आहे. पोलिसांकडून पीडितांनाच दोन-तीन दिवस स्वतः शोधण्याचा सल्ला दिला जातो किंवा दोन-तीन दिवसांनी पोलिस ठाण्यास येण्याचा सल्ला दिला जात आहे.