Sangli Municipal Election 2026: भाजप-राष्ट्रवादीमध्ये मैत्रीचा केवळ मुखवटा, आतून संघर्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 19:00 IST2025-12-17T18:59:28+5:302025-12-17T19:00:58+5:30
सांगलीत उडणार तिरंगी धुरळा, राजकीय हालचाली गतिमान

Sangli Municipal Election 2026: भाजप-राष्ट्रवादीमध्ये मैत्रीचा केवळ मुखवटा, आतून संघर्ष
शीतल पाटील
सांगली : महापालिका निवडणुकीसाठी आचारसंहिता जाहीर होताच राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार गटात ‘मैत्रीपूर्ण लढत’ होणार असल्याचे संकेत दिल्याने शहरातील राजकीय गणिते एका झटक्यात बदलली आहेत. आतापर्यंत महायुती विरुद्ध महाआघाडी अशी लढतीची शक्यता असलेली महापालिका निवडणूक आता तिरंगी होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे भाजपसमोर एक नव्हे तर दोन आघाड्यांचे आव्हान उभे राहणार आहे.
महापालिका निवडणुकीसाठी भाजपने महिन्याभरापासूनच तयारी सुरू केली होती. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकीच्या तयारीसाठी अनेक बैठकाही घेतल्या. उमेदवार निश्चितीसाठी कमिटी स्थापन करून मुलाखतीचा कार्यक्रमही पार पडला. दुसरीकडे महाआघाडीचे नेते जयंत पाटील, खा. विशाल पाटील, आ. विश्वजित कदम यांनीही इच्छुकांशी संवाद साधला.
महापालिकेच्या निवडणुकीत आघाडी म्हणून मैदानात उतरण्याची घोषणा केली. त्याच आचारसंहिता लागू होताच मुख्यमंत्री फडणवीस यांनी अनेक महापालिकेत अजितदादा गटाशी मैत्रीपूर्ण लढती होतील, असे जाहीर केले. यापूर्वीच सांगली महापालिकेत भाजप व राष्ट्रवादी अजित पवार गटात युतीचे काळे ढग दाटले होते. त्यात मुख्यमंत्र्यांच्या घोषणेने राष्ट्रवादीला स्वतंत्र लढण्याची वाट मोकळी झाली आहे.
भाजपसमोर आता केवळ एक नाही, तर दोन आघाड्यांचे आव्हान उभे राहणार आहे. एकीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आघाडी उभी करत असताना, दुसरीकडे अजितदादांचा स्वतंत्र गट भाजपसमोर ताकदीने मैदानात उतरण्याची तयारी करीत आहे. मैत्रीपूर्ण लढतीच्या घोषणेमुळे भाजप-अजित पवार गटातील अंतर्गत स्पर्धा वाढण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. या बदललेल्या समीकरणांचा सर्वाधिक फटका मतविभाजनाला बसणार असून, त्याचा थेट लाभ कोणाच्या पदरात पडणार, हे निकालाच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे. मात्र, सांगली महापालिकेची निवडणूक यंदा केवळ सत्तेसाठी नव्हे, तर राजकीय वर्चस्वाच्या प्रतिष्ठेसाठी लढली जाणार आहे.
मिरजेत भाजपची वाट बिकट
मिरजेतील २७ जागांवर भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गटाचा डोळा आहे. गत निवडणुकीत भाजपला मिरजेतून १७ ते १८ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे भाजपचा सत्तेचा मार्ग सुकर झाला होता. यंदा मात्र राष्ट्रवादीचे आमदार इद्रीस नायकवडी यांनी भाजपसमोर आव्हान उभे केले आहेत. त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, भाजप व जनसुराज्य पक्षातील माजी नगरसेवकांनी अजित पवार गटाची वाट धरली आहे. लवकरच या नगरसेवकांचा मिरजेत अजितदादांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार आहे. दिग्गज नगरसेवक अजित पवार गटाच्या गळ्याला लागल्याने मिरजेतील राजकीय समीकरणे बदलली आहेत. भाजप विरुद्ध अजित गटातील हा सामना चुरशीचा होणार आहे.
सांगलीत अजितदादा गटाची कोंडी
अजितदादा गटाने स्वतंत्र लढण्याची तयारी चालविली आहे. इच्छुकांच्या मुलाखतींना लवकरच सुरुवात होणार आहे. मिरजेत अजितदादा गटाला भाजपसोबत युती नको आहे, तर सांगलीतील माजी नगरसेवक मात्र भाजपसोबत युती करण्याचा आग्रह धरत आहेत. स्वतंत्र लढण्याचा निर्णय झाल्यास या नगरसेवकांची कोंडी होणार आहे. माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, विष्णू माने यांना त्यांच्या प्रभागात तिरंगी लढतीला सामोरे जावे लागेल.