Sangli Politics: महापालिका, जिल्हा परिषदसाठी पक्षांतराचा धडाका, जयश्रीताई पाटील यांचेही नाव चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 18:36 IST2025-03-19T18:36:09+5:302025-03-19T18:36:43+5:30
अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच पक्षप्रवेशाचा बार

Sangli Politics: महापालिका, जिल्हा परिषदसाठी पक्षांतराचा धडाका, जयश्रीताई पाटील यांचेही नाव चर्चेत
सांगली : महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने जिल्ह्यात ताकद वाढवायला सुरुवात केली आहे. सांगली, मिरजेसह ग्रामीण भागातील नेत्यांसाठी पायघड्या अंथरल्या असून, विधीमंडळाच्या अधिवेशनानंतर पक्ष प्रवेशाचा बार उडण्याची शक्यता आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील माजी आमदार मंडळींचा समावेश आहे.
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील काही माजी आमदार व नेतेमंडळी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती घेण्याच्या तयारीत आहेत. पहिल्या टप्प्यात महापालिका आणि दुस-या टप्प्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका होण्याची चिन्हे आहेत. त्या लढविण्याच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. सांगलीत नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आवाहन केले होते. मित्रपक्ष काय करतील? याकडे लक्ष न देता तयारी करा, अशी सूचना केली होती.
दरम्यान, जिल्हयातील राष्ट्रवादी काॅंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्तेही अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली तयारीला लागले आहेत. सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादीची ताकद वाढविण्यासाठी काही माजी आमदार मंडळींना पक्षात प्रवेश दिला जाणार आहे. यापार्श्वभूमीवर मिरजेत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रताप पाटील व निशीकांत पाटील यांच्या उपस्थित सोमवारी गोपनीय बैठक झाली. यावेळी माजी आमदार विलासराव जगताप, राजेंद्रअण्णा देशमुख, अजितराव घोरपडे व माजीमंत्री शिवाजीराव नाईक हे उपस्थित होते.
पाटील यांना सोडून अजित पवार यांच्याकडे कल..
शिराळ्याचे माजीमंत्री शिवाजीराव नाईक हे चारच दिवसांपूर्वी (शनिवारी) सांगलीत झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्याला हजर होते. व्यासपीठावर पहिल्या रांगेत जयंत पाटील यांच्याशेजारी बसले होते. ते सोमवारी अजित पवार यांच्याकडे प्रवेशासाठी मिरजेत शासकीय विश्रामगृहातील बैठकीत सामील झाल्याचे पाहायला मिळाले. विलासराव जगताप हेदेखील काही दिवसांपूर्वी जयंत पाटील यांच्यासोबत दिसले होते. त्यांनीही आता अजित पवार यांच्याकडे दिशा बदलली आहे. जतचे नेते सुरेश शिंदे हेदेखील पक्षप्रवेशात सोबत असतील, असे सांगण्यात आले. या नेत्यांच्या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादीला जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत ताकद मिळणार आहे.
जयश्रीताई पाटील यांचेही नाव चर्चेत
जिल्हा बॅंकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांचे नावही राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रवेशाच्या यादीत चर्चेत आहे. यापूर्वी त्यांनी काहीवेळा अजित पवार यांच्या भेटी घेतल्याचीही माहिती आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर त्यांचाही राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश होऊ शकतो, अशी चर्चा सुरू आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर काही नेते राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये येत असतील, तर त्यांचे स्वागत आहे. महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने जयश्रीताई पाटील यांनी आमच्या पक्षात येणे फायद्याचेच ठरणार आहे. महापालिका क्षेत्रात त्यांना मानणारा मदनभाऊ पाटील गट प्रबळ आहे. महापालिकेत सत्ता येण्याच्यादृष्टीने त्यांच्या पक्ष प्रवेशाची चर्चा सुरू आहे. - पद्माकर जगदाळे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस
राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेशाच्या दृष्टीने आमची प्राथमिक बैठक मिरजेत झाली. अधिवेशन संपल्यानंतर पक्षनेते अजित पवार यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेणार आहोत. आमच्यासोबत आणखी काही नेते राष्ट्रवादीमध्ये येतील. - विलासराव जगताप, माजी आमदार