..तर सांगलीचे तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता यांना सहआरोपी करू, लक्षवेधीवर गृहराज्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 13:28 IST2025-07-10T13:28:10+5:302025-07-10T13:28:35+5:30
बांधकाम परवान्यासाठी सात लाखांची लाच मागितल्याप्रकरणी सांगली महापालिकेचे उपायुक्त वैभव साबळे यांना निलंबित केले आहे

..तर सांगलीचे तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता यांना सहआरोपी करू, लक्षवेधीवर गृहराज्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
सांगली : सांगलीतील २४ मजली इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी सात लाखांची लाच मागितल्याप्रकरणी सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेचे उपायुक्त वैभव साबळे यांना निलंबित केले आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असून, तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता यांचा यात सहभाग आढळून आला तर त्यांनाही सहआरोपी केले जाईल, अशी घोषणा गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधान परिषदेत केली.
आमदार सदाभाऊ खोत यांनी याप्रकरणी प्रश्न उपस्थित केला होता. खोत म्हणाले की, सांगलीतील २४ मजली इमारतीच्या बांधकामाला परवानगी देण्यासाठी शुभम गुप्ता यांच्या वतीने आपण लाच मागत आहोत, असे उपायुक्त वैभव साबळे याने लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पडताळणीवेळी सांगितल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणाशी शुभम गुप्ता यांचा संबंध असून, त्यांनी लाच न मिळाल्याने बदली होऊन जाताना काहीही कारण नसताना बांधकाम परवान्याचा अर्ज रिजेक्ट केला होता, असा आरोप तक्रारदाराने केला आहे. त्यामुळे त्यांनाही यात सहआरोपी करावे, अशी तक्रारदाराची मागणी आहे.
या प्रकरणाचा उल्लेख करीत खोत म्हणाले, वीजबिल घोटाळ्याच्या एसआयटीमध्ये ज्यांच्याकडे जबाबदारी दिली होती त्या वैभव साबळेला लाच प्रकरणात अटक झाली असून, त्याच्यासह आयुक्त गुप्ता यांच्यावर गुन्हा दाखल करावा. एका प्लॉटच्या बांधकाम परवानगीसाठी ते २५ हजार रुपये घेत होते. त्यामुळे गुप्ता यांच्यावर कारवाईची मागणी केली. खोत यांच्याबरोबरच आमदार परिणय फुके आणि प्रसाद लाड यांनी चर्चेत भाग घेतला.
प्रश्नाला उत्तर देताना गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे स्पष्ट केले. चौकशीत जर गुप्ता हे दोषी आढळत असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे सांगितले.