Sangli: शाळेच्या वेळेत आता शिक्षकांशी ‘नो कॉन्टॅक्ट’; मोबाइलला बंदी असणारी नेमकी शाळा कोणती.. वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 18:28 IST2024-12-31T18:27:50+5:302024-12-31T18:28:16+5:30
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ

Sangli: शाळेच्या वेळेत आता शिक्षकांशी ‘नो कॉन्टॅक्ट’; मोबाइलला बंदी असणारी नेमकी शाळा कोणती.. वाचा
मालगाव : कोणत्याही शासकीय कार्यालयात कर्तव्य बजावताना मोबाइलचा वापर करू नये, असा अलिखित आदेश असतो. तरीही मोबाइलचा मोह सुटलेला नाही हे आपण नेहमी पाहिले आहे. शाळांमध्येही ही परिस्थिती नाकारण्यासारखी नाही. याला सिद्धेवडी (ता. मिरज) येथील जिल्हा परिषदेच्या माॅडेल शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक अपवाद ठरले आहेत. ज्ञानार्जनाच्या वेळेत सर्वच शिक्षक मोबाइलपासून दूर असतात. त्यामुळे शाळेच्या वेळेत त्यांचा संपर्क होत नाही. हा निर्णय कौतुकाचा ठरला आहे.
मोबाइल ही संपर्काची सोय असली तरी कर्तव्याचे भान राहत नाही. मुख्यमंत्री माझी शाळा स्पर्धेत राज्य स्तराला गवसणी घातलेल्या सिद्धेवाडी (ता. मिरज) येथील जिल्हा परिषद माॅडेल स्कूलचे शिस्तप्रिय शिक्षक याला अपवाद ठरले आहेत. शाळा गुणवत्तेतही अग्रेसर राहावी, यासाठी शिक्षक ज्ञानार्जनाच्या कामाला जिद्दीने लागले. त्यांनी यासाठी मुख्याध्यापक विष्णू ओमासे यांच्या प्रेरणेतून शाळेच्या वेळेत मोबाइलपासून दूर राहण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. शाळेत आल्यानंतर हे शिक्षक आपला मोबाइल मुख्याध्यापकांकडे सोपवून वर्गात जातात. त्यामुळे शाळेच्या वेळेत या शिक्षकांशी संपर्क होत नाही.
या शिस्तीचे चांगले परिणाम गुणवत्तावाढीत दिसत आहेत. गत शैक्षणिक वर्षात एन. एम. एम. एस. परीक्षेत ७ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले. यापैकी ५ विद्यार्थ्यांना ६० हजार रुपये व २ विद्यार्थ्यांना ४८ हजार रुपयांची शिष्यवृत्ती मंजूर झाली. सध्या याच शाळेचे प्रज्ञाशोधमध्ये २००, पतंगराव सकाॅलरशिप इयत्ता ४ ते ७ चे ८०, मंथन शिष्यवृत्ती १२०, स्काॅलरशिप ५ ते ८ वीचे ५०, नवोदयसाठी १०, एन. एम. एम. एस. परीक्षेसाठी ३६ असे ३९६ विद्यार्थी सहभागी आहेत. क्रीडा स्पर्धेतही या शाळेचा लौकिक असतो. सध्या या शिक्षकांनी शाळेच्या वेळेत मोबाइल न वापरण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे पालक वर्गातून कौतुक होत आहे. शिक्षकांनी राबविलेला हा उपक्रम इतर शाळांनी घेण्यासारखा आहे.
विद्यार्थ्यांनाही भोंग्याने लावली शिस्त
शाळेत एकीकडे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी स्वत:ला शिस्त लावली असताना, मुख्याध्यापक ओमासे व शिक्षकांनी स्वखर्चाने शाळेत भोंगा बसविला आहे. सकाळी ६, सायंकाळी ७ व रात्री ९ वाजता वाजणाऱ्या भोंग्याने विद्यार्थ्यांत अभ्यासाची शिस्त लावली आहे. याचे पंचायत समिती प्रशासनानेही कौतुक केले आहे.