सांगली जिल्ह्यातील तासगाव, खानापूर, पलूसमध्ये महिलाराज; जत, शिराळा खुले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 14:09 IST2025-10-07T14:08:40+5:302025-10-07T14:09:33+5:30
नगराध्यक्षपदांची आरक्षणे जाहीर, इस्लामपूर, आटपाडीत ओबीसी, तर आष्ट्यात अनुसूचित पुरुष

सांगली जिल्ह्यातील तासगाव, खानापूर, पलूसमध्ये महिलाराज; जत, शिराळा खुले
सांगली : जिल्ह्यातील नगरपालिकांच्या नगराध्यक्षपदांचे आरक्षण सोमवारी जाहीर झाले. आरक्षण निश्चित झाल्याने राजकीय हालचालींना वेग येणार आहे. तासगावचे नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव घोषित झाले. यामुळे अनेक दिग्गज नेत्यांनी आता आपल्या सौभाग्यवतींना रिंगणात उतरविण्याची तयारी सुरू केली आहे.
आटपाडीमध्ये इतर मागास प्रवर्गासाठी नगराध्यक्षपदी राखीव झाले. तेथे भाजपा व शिंदेसेनेतच खरी लढत होण्याची चिन्हे आहेत. या स्थितीत राष्ट्रवादी काॅंग्रेस व काॅंग्रेसची भूमिका काय असेल? याकडे लक्ष लागून राहिले आहे. नगरपंचायतीची ही पहिलीच निवडणूक आहे. ‘पुरुष सर्वसाधारण’ आरक्षण गृहीत धरून प्रचारयंत्रणा सज्ज केलेल्यांना धक्का बसला आहे. आता नेतेमंडळींना ओबीसी समाजातूनच उमेदवार निश्चित करावा लागणार आहे.
खानापूरचे नगराध्यक्षपद इतर मागास महिलेसाठी आरक्षित झाले. नगरपंचायतीची मुदत पुढील वर्षी संपणार आहे. सध्या येथे आमदार सुहास बाबर व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुहास शिंदे गटाची सत्ता आहे.
जतचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण झाले आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत तुफान रणसंग्राम रंगण्याची चिन्हे आहेत. पलूसमध्ये महिला राज आले आहे. काँग्रेस व भाजपमध्येच खरी लढत रंगण्याची शक्यता आहे. नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित झाले. त्यामुळे देव पाण्यात ठेवून बसलेल्या पुरुष कारभाऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे. महिला आरक्षणामुळे अनेक नवे चेहरे दिसण्याची शक्यता आहे.
शिराळा नगराध्यक्षपद खुले झाले आहे. त्यामुळे इच्छुकांच्या भाऊगर्दीने राजकीय आखाडा तापला आहे. उमेदवार निश्चिती करताना नेतेमंडळींची तारेवरची कसरत होणार आहे. शिराळ्याच्या राजकारणात स्थानिक पातळीवर मानसिंगराव नाईक, शिवाजीराव नाईक हे दोन गट तर सत्यजित देशमुख, सम्राट महाडिक हे एकत्र आले आहेत. यावेळी शिंदेसेनाही रिंगणात आहे. त्यामुळे ही लढत ‘राष्ट्रवादी-राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप-शिवसेना महायुती’ अशीच होण्याची शक्यता आहे.
आष्टा नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद अनुसूचित जातीतील पुरुष उमेदवारासाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे खुल्या गटातील इच्छुक उमेदवारांच्या आशेवर पाणी पडले आहे. नगराध्यक्षपदाची संधी कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इस्लामपूरचे नगराध्यक्षपद इतर मागास पुरुषासाठी राखीव झाले आहे. त्यामुळे खुल्या वर्गातील इच्छुक नेत्यांत अस्वस्थता आहे.