Sangli-ZP Election: तासगावात नेत्यांच्या भूमिकेवर ठरणार इच्छुकांचे राजकीय भवितव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 19:14 IST2026-01-14T19:06:12+5:302026-01-14T19:14:47+5:30
युती, आघाडीच्या समीकरणांचे त्रांगडे; इच्छुकांची रस्सीखेच

Sangli-ZP Election: तासगावात नेत्यांच्या भूमिकेवर ठरणार इच्छुकांचे राजकीय भवितव्य
दत्ता पाटील
तासगाव : अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले आहे. तासगाव तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गट आणि बारा पंचायत समिती गणात इच्छुकांची मोठी रस्सीखेच आहे. युती आणि आघाडीच्या समीकरणांवर लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे नेत्यांच्या भूमिकेवरच इच्छुकांचे भवितव्य अवलंबून असल्याचे सध्याचे चित्र आहे.
तासगाव नगरपालिका निवडणुकीत युती आणि आघाडीचे त्रांगडे उडाले होते. यामुळे या ठिकाणी बहुरंगी लढत झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. ही निवडणूक संपता संपताच माजी खासदार संजय पाटील यांच्या राजकीय भूमिकेने पुन्हा ‘यू टर्न’ घेतल्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीबाबतदेखील उत्सुकता निर्माण झाली आहे.
गतवेळच्या निवडणुकीत आबा गट विरुद्ध काका गट असाच दुरंगी सामना पाहायला मिळाला होता. त्यावेळी माजी आमदार सुमनताई पाटील आणि जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आबा गटाला यश मिळाले होते, तर तत्कालीन खासदार संजय काका पाटील यांचा गट पिछाडीवर राहिला होता. यावेळी मतदारसंघात अनेक पक्षात इच्छुकांची संख्या जास्त आहे. मतदारसंघातील आरक्षणामुळे जिल्हा परिषदेच्या सहापैकी पाच गटावर सर्वसाधारण आरक्षण आहे. त्यामुळे इच्छुकांची झुंबड उडाली आहे. विशेषतः आमदार रोहित पाटील यांच्याकडे उमेदवारीची मोठी स्पर्धा पाहायला मिळत आहे.
अद्याप युती आणि आघाडीचे समीकरण स्पष्ट झाले नाही. सहापैकी दोन जिल्हा परिषद गट खानापूर–आटपाडी विधानसभा मतदारसंघात येत आहेत. त्या मतदारसंघातील नेत्यांची भूमिका काय असणार हेही अद्याप स्पष्ट नाही. त्यामुळे नेत्यांच्या भूमिकेवरच इच्छुकांचे भवितव्य ठरणार असून, त्यानंतरच लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
संजयकाका पुन्हा घड्याळ हातात बांधणार?
तासगाव नगरपालिका निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीशी फारकत घेत संजय काकांनी विकास आघाडीचा झेंडा हातात घेतला. स्वाभिमानी आघाडीच्या माध्यमातून नगरपालिकेची निवडणूक लढवली. या निवडणुकीचा निकाल लागतो न लागतो तोच संजय काकांनी महापालिका निवडणुकीत घड्याळ हातात घेतले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत संजय काका ‘यू टर्न’ घेत पुन्हा घड्याळ हातात बांधणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
विसापूर गटात नेत्यांच्या भूमिकेची उत्सुकता
मांजर्डे आणि विसापूर जिल्हा परिषद गटाचा खानापूर–आटपाडी विधानसभा मतदारसंघात समावेश आहे. या दोन गटात शिवसेनेचे आमदार सुहास बाबर आणि भाजपचे वैभव पाटील यांचा कनेक्ट आहे. त्यामुळे या मतदारसंघाच्या बाबतीत खानापूरच्या नेत्यांची भूमिका काय असणार, याचीही उत्सुकता आहे.