सांगली जिल्हा परिषद गट ६१, पंचायत समित्यांचे गण १२२; प्रारुप रचना प्रसिद्ध, दोन तालुक्यात झाला बदल.. वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 16:10 IST2025-07-15T16:09:58+5:302025-07-15T16:10:18+5:30
आटपाडी तालुक्यातील प्रभाग रचनेत बदल

सांगली जिल्हा परिषद गट ६१, पंचायत समित्यांचे गण १२२; प्रारुप रचना प्रसिद्ध, दोन तालुक्यात झाला बदल.. वाचा
सांगली : जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांची प्रारुप रचना सोमवारी जिल्हा प्रशासनाने प्रसिद्ध केली. जिल्ह्यात जिल्हा परिषद गट ६०वरून ६१, तर पंचायत समित्यांचे गण १२०वरून १२२ झाले आहेत. खानापूर तालुक्यात जिल्हा परिषदेचा करंजे गट व पंचायत समितीचे दोन गण वाढले. आटपाडी तालुक्यात जिल्हा परिषद गट आणि गणात बदल झाले असून, निंबवडे गट नवीन झाला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मागील महिन्यात निवडणूक प्रक्रिया राबवण्याचे आदेश दिले होते. राज्य निवडणूक आयोगाने प्रारुप रचनेचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार जिल्हा परिषदेची प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध केली. नव्या रचनेत जिल्हा परिषदेचे ६१ गट, तर पंचायत समित्यांचे गण १२२ झाले आहेत.
खानापूर तालुक्यात जिल्हा परिषदेचा करंजे गट आणि पंचायत समितीचे बलवडी आणि करंजे हे दोन गण वाढले आहेत. तत्पूर्वी खानापूर हा जिल्हा परिषदेचा गट होता. खानापूर नगरपंचायत झाल्याने ते गाव रद्द झाले. म्हणूनच करंजे हा नव्याने गट झाला. आटपाडी तालुक्यात प्रभाग रचना करताना गावांमध्ये मोठा बदल झाला आहे. आटपाडी नगरपंचायत झाल्याने गट रद्द केला. निंबवडे हा नवीन गट झाला असून, घरनिकी आणि निंबवडे हे पंचायत समितीचे दोन गण झाले आहेत.
२०१७ मधील गट, गण जैसे थे
नवीन मतदारसंघ तयार करताना अपवादात्मक शेजारच्या गटाची फोडाफोड झाली आहे. परंतु, आटपाडी तालुक्यातील लोकसंख्येचे गणित गृहीत धरता तेथील प्रभाग रचनेत मोठे बदल झाले. जिल्ह्याच्या उर्वरित तालुक्यात २०१७मध्ये झालेल्या निवडणुकीतील गट आणि गण तसेच राहिले आहेत. काही ठिकाणी गाव बदलल्यामुळे काही इच्छुकांची चांगलीच गोची झाली.
महायुती विरुध्द महाआघाडी लढत
सन २०१७मध्ये झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत भाजपने बाजी मारली होती. सध्या जिल्ह्याची राजकीय स्थिती खूपच बदलली आहे. आगामी निवडणुकीत महायुती विरूद्ध राष्ट्रवादी, काँग्रेस, उध्दवसेना महाविकास आघाडी यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे. सध्याची राजकीय स्थिती पाहता महायुतीसाठी सोयीस्कर गट असल्याची राजकर्त्यांमध्ये चर्चा सुरू आहे.
प्रभाग रचना कार्यक्रम
- हरकती व सूचना : २१ जुलै
- हरकतींवर विभागीय आयुक्तांना प्रस्ताव : २८ जुलै
- हरकती व सूचनांवर सुनावणी : ११ ऑगस्ट
- अंतिम प्रभाग रचनेस मंजुरी : १८ ऑगस्ट
तालुकानिहाय गट आणि गणांची संख्या
तालुका /गट /गण
आटपाडी - ४ / ८
जत - ९ / १८
खानापूर - ४ / ८
कडेगाव - ४ / ८
तासगाव - ६ / १२
क.महांकाळ - ४ / ८
पलूस - ४ / ८
वाळवा - ११ / २२
शिराळा - ४ / ८
मिरज - ११ / २२
एकूण - ६१ / १२२