Sangli Politics: भाजपने काँग्रेस फोडली, आता जयंतरावांची राष्ट्रवादी फुटणार; कोणत्या नेत्यांची नावे चर्चेत.. वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 19:32 IST2025-07-09T19:32:18+5:302025-07-09T19:32:33+5:30
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी शह-काटशह

Sangli Politics: भाजपने काँग्रेस फोडली, आता जयंतरावांची राष्ट्रवादी फुटणार; कोणत्या नेत्यांची नावे चर्चेत.. वाचा
सांगली : राष्ट्रवादीच्या विभाजनावेळी सांगली जिल्ह्यात मजबूत स्थितीत असणारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची नौका आता फोडाफोडीच्या वादळात हेलकावे खाऊ लागली आहे. सत्तेच्या जहाजातून ‘विकासा’ चा पैलतीर गाठण्यासाठी आतूर असलेल्या काही नेत्यांनी लाइफ जॅकेटसह उड्या घेतल्या तर काहींनी त्यासाठीची तयारी केली आहे. भाजपने एकीकडे महापालिका क्षेत्रातील काँग्रेस फोडली असताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष फोडून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना धक्का देण्याची तयारी सुरु आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी जिल्ह्यात पक्षफोडीच्या राजकारणाने वातावरण ढवळून निघत आहे. महापालिका क्षेत्रातील भाजपने काँग्रेसचा एक मोठा गट फोडला असताना आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून विरोधी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष फोडण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. ही रस्सीखेच जिल्ह्यात मोठ्या उलथा पालथ घडविणारी ठरणार आहे.
राज्यातील शिवसेना फुटल्यानंतर जिल्ह्यातील अनेक नेते, पदाधिकारीही लगेच फुटले होते. राज्यातील राष्ट्रवादी फुटल्यानंतर मात्र, जिल्ह्यातील जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्ष मजबूत स्थितीत दिसत होता. कालांतराने मात्र, त्यांच्या नौकेतील अनेक नेते अजित पवारांच्या गटात सहभागी झाले. आता जयंत पाटील यांचे नेतृत्व मानून काम करणाऱ्या उर्वरित दिग्गज नेत्यांनाही अजित पवार गटाने प्रवेशाची ऑफर दिली आहे.
आता या नेत्यांची नावे चर्चेत
जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्षांपासून कार्यरत असलेले आमदार अरुण लाड, पलूसचे युवा नेते शरद लाड, शिराळ्याचे माजी आमदार मानसिंगराव नाईक, कवठेमहांकाळच्या नेत्या अनिता सगरे यांच्याशी सातत्याने राष्ट्रवादी अजित पवार गटाची चर्चा सुरु आहे. येत्या काही दिवसांत यातील काही नेते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याची चिन्हे आहेत.
यांनी सोडली जयंतरावांची साथ
माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला. त्यापूर्वी आमदार इद्रिस नायकवडी, महापालिकेचे माजी सभापती प्रा. पद्माकर जगदाळे, विट्यातील ॲड. वैभव पाटील, आटपाडीचे राजेंद्रअण्णा देशमुख या नेत्यांनी जयंतरावांची साथ सोडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणावरील जयंत पाटील यांची पकड सैल होत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत फटका बसणार
फोडाफोडीच्या या राजकारणामुळे सांगली जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला फुटीमुळे मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीसमोर अडचणी
जिल्ह्याचा विचार केल्यास महाविकास आघाडीत काँग्रेस व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष हे दोन पक्ष अधिक मजबूत मानले जात होते. तुलनेने उद्धवसेनेची ताकद कमी आहे. आता फोडाफोडीच्या राजकारणाने सक्षम समजल्या जाणाऱ्या दोन्ही पक्षांची ताकदही कमी होऊ लागली आहे.