शक्तिपीठ महामार्ग रद्द होईपर्यंत लढा थांबणार नाही, सांगलीत महामार्गबाधित शेती बचाव कृती समितीची पार पडली बैठक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 18:51 IST2026-01-07T18:51:13+5:302026-01-07T18:51:52+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेखांकन बदलण्याची घोषणा करून एका शेतकऱ्यावरील संकट दुसऱ्या शेतकऱ्यावर टाकले

शक्तिपीठ महामार्ग रद्द होईपर्यंत लढा थांबणार नाही, सांगलीत महामार्गबाधित शेती बचाव कृती समितीची पार पडली बैठक
सांगली : शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची घोषणा महाराष्ट्र सरकार करीत नाही, तोपर्यंत आमचा लढा थांबणार नाही, असा इशारा अखिल भारतीय किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष उमेश देशमुख यांनी दिला. शक्तिपीठ महामार्गबाधित शेती बचाव कृती समितीची बैठक मंगळवारी सांगलीत झाली. त्यावेळी उमेश देशमुख बोलत होते.
उमेश देशमुख म्हणाले, विधानसभेच्या अधिवेशनाच्या कालावधीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेखांकन बदलण्याची घोषणा करून एका शेतकऱ्यावरील संकट दुसऱ्या शेतकऱ्यावर टाकले आहे. त्यामुळे महामार्ग रद्दच झाला पाहिजे, ही आमची मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत आमचा लढा चालूच राहील.
स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे म्हणाले, मुख्यमंत्री यांनी रेखांकन बदलत असल्याचे जाहीर केले आहे. पण, नागपूर ते रत्नागिरी हा महामार्ग फक्त सांगली जिल्ह्यातच नाही, तर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांतही समांतर आहे. त्यामुळे हा महामार्गच रद्द झाला पाहिजे.
यावेळी प्रभाकर तोडकर, सतीश साखळकर, उमेश एडके, सुनील पवार, विष्णू पाटील, यशवंत हारुगडे, आदिक पाटील, दिनकर पाटील, श्रीकांत पाटील कोकाटे आदींसह बाधित शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.
शुक्रवारी जिल्हाधिकारी यांना देणार निवेदन
रेखांकन बदलून चालणार नाही तर संपूर्ण शक्तिपीठ महामार्गच रद्द केला पाहिजे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांना दि. ९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता देण्यात येणार आहे. यावेळी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रभाकर तोडकर यांनी केले आहे.