Sangli: अज्ञात महिलेच्या मृतदेहाचे मोकाट कुत्र्यांनी लचके तोडले, नातेवाईकांचा शोध सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 17:37 IST2025-12-24T17:36:36+5:302025-12-24T17:37:49+5:30
मृत महिला स्थानिक नसल्याचा संशय असून तिचा मृत्यू चार-पाच दिवसांपूर्वी झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला

संग्रहित छाया
मिरज : टाकळी (ता. मिरज) येथे एका अज्ञात महिलेचा मोकाट कुत्र्यांनी खाल्लेला मृतदेह आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तसेच, महिलेच्या मृत्यूचे कारण आणि तिच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत.
दि. २३ रोजी दुपारी १२:३० वाजता मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत टाकळी गावात ओढा पुलाजवळ, बोलवाड येथील कुमार चवगोंडा पाटील यांच्या उसाच्या शेतात या अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला. माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी प्रणिल गिल्डा आणि पोलिस निरीक्षक अजित शिद यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
मृत महिला मध्यम बांधणीची असून अंदाजे वय ३० ते ४० वर्षे, उंची सुमारे ५ फूट आहे. तिने काळ्या रंगाची साडी आणि काळा ब्लाऊज परिधान केलेला होता. तिच्या डाव्या पायात काळा दोरा, उजव्या पायाच्या अंगठ्याजवळ काळा दोरा, दोन्ही पायांत जोडवी तसेच डाव्या हातात लाल रंगाचा धागा बांधलेला होता.
मृतदेहाजवळ लाल, निळ्या आणि काळ्या रंगाची शाल सापडली. पोलिसांनी प्राथमिक तपासात मृत महिलेच्या छातीवरील भाग आणि एका हातावर कुत्रे किंवा कोल्ह्याने हमखास खाल्ल्याचा संशय व्यक्त केला आहे. मृत महिला स्थानिक नसल्याचा संशय असून तिचा मृत्यू चार-पाच दिवसांपूर्वी झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
या अज्ञात मृत महिलेबाबत कोणालाही काही माहिती असल्यास ग्रामीण पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मागील प्रकरण म्हणून मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.