तरुणाईमध्ये प्रसिद्धीसाठी ‘गँगस्टर’ संस्कृतीचे आकर्षण, ‘रील्स’च्या मनोरंजनातून गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 15:29 IST2026-03-23T15:29:21+5:302026-03-23T15:29:40+5:30

आग लावली अन् नंतर खुनाचा सीन

The appeal of gangster culture to gain popularity on social media among youth | तरुणाईमध्ये प्रसिद्धीसाठी ‘गँगस्टर’ संस्कृतीचे आकर्षण, ‘रील्स’च्या मनोरंजनातून गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी

तरुणाईमध्ये प्रसिद्धीसाठी ‘गँगस्टर’ संस्कृतीचे आकर्षण, ‘रील्स’च्या मनोरंजनातून गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी

सांगली : मध्यवर्ती परिसरातील एका पडीक इमारतीमध्ये विशेषतः शासकीय निवासस्थानांच्या परिसरात उघडपणे खोट्या शस्त्रांचा वापर करून खुनाची रील्स बनवण्याचा प्रकार घडला. पोलिसांनी संबंधित टोळक्यावर कारवाई केली. परंतु हा प्रकार म्हणजे गुन्हेगारीचे उदात्तीकरण असून, प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सुरू आहे.

सध्याच्या तरुणाईमध्ये सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी 'गँगस्टर' संस्कृतीचे आकर्षण वाढताना दिसत आहे. खोट्या बंदुका आणि हत्यारे घेऊन खुनाचे सीन चित्रित करणे हा प्रकार केवळ मनोरंजनापुरता मर्यादित राहिलेला नाही. यातून भविष्यातील संभाव्य गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी मिळते आणि सामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होते. शहरातील अंधाऱ्या जागांचा वापर अशा कृत्यांसाठी होणे हे सामाजिक आरोग्यासाठी घातक म्हणावे लागेल.

पोलिस अधीक्षकांनी आदेश दिल्यानंतर काहीकाळ कारवाईचा धडाका दिसला. परंतु 'नव्याचे नऊ दिवस' या उक्तीप्रमाणे मोहीम थंड पडली. पोलिसांनी सातत्य न ठेवल्यामुळे गुन्हेगारांचे मनोबल वाढू शकते. शहरातील बंद आणि पडक्या इमारती आता 'डार्क स्पॉट' बनल्या आहेत. याठिकाणी केवळ रील्स बनविले जात नाहीत, तर नशेखोरी सुरू असते. काही दिवसांपूर्वी बंद इमारतीमध्ये आग लावून नशेखोर पळाले. काँग्रेस कमिटीजवळील इमारतीसारखी मध्यवर्ती ठिकाणे जर असुरक्षित असतील, तर शहराच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर येतो.

नशामुक्त अभियानांतर्गत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सक्त आदेश दिल्यानंतर प्रशासकीय पातळीवर त्याची काटेकोर आणि सातत्यपूर्ण अंमलबजावणी होण्याची गरज आहे. बैठकांमध्ये होणारे निर्णय आणि प्रत्यक्ष रस्त्यावरील कारवाई यात मोठी तफावत आहे. पोलिसांच्या दुर्लक्षामुळे नशेखोरांचे चांगलेच फावले आहे. केवळ मोहिमेपुरते मर्यादित न राहता, 'बीट मार्शल' आणि पोलिस पथकांनी डार्क स्पॉटवर दररोज अनपेक्षित गस्त घातली पाहिजे.

महापालिका आणि पोलिसांनी मिळून अशा पडक्या इमारतींच्या परिसरात हायमास्ट दिवे आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. ज्या खासगी किंवा निमशासकीय इमारती पडीक आहेत, त्यांच्या मालकांना त्या सुरक्षित ठेवण्याच्या किंवा पाडून टाकण्याच्या नोटीस द्याव्यात. गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणारे रील्स सोशल मीडियावर अपलोड करणाऱ्या तरुणांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी. त्यासाठी सायबर पोलिस ठाण्याकडील सेलने सोशल मीडियावर करडी नजर ठेवण्याची गरज आहे. तरच भविष्यात अशा घटनांना आळा बसू शकेल. तसेच कळत-नकळत गुन्हेगारीकडे वळणारी पावले योग्य दिशेने वाटचाल करतील.

बंद इमारती नशेखाेरांचे अड्डे

शहरात तसेच उपनगरातील बंद व पडीत इमारती या सध्या नशेखोरांचे आणि रील्स बनवणाऱ्या तरुणांची आवडती ठिकाणे बनली आहेत. या जागांवर कोणाचे नियंत्रण नसल्यामुळे त्यांचे चांगलेच फावले आहे. अशा इमारतींची यादी बनवून त्या सुरक्षित कराव्यात किंवा तेथे कुंपण घालण्याची गरज आहे.

आग लावली अन् नंतर खुनाचा सीन

शहरातील मध्यवर्ती इमारतीमध्ये नशेखोरांनी काही दिवसांपूर्वी आग लावून पलायन केल्याचा प्रकार घडला. त्यानंतर याच परिसरात दिवसा ढवळ्या खुनाचा सीन असलेली रील्स बनवली गेली. हा प्रकार पाहून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Web Title : युवाओं में गैंगस्टर संस्कृति का आकर्षण, रीलों से अपराध को बढ़ावा

Web Summary : सांगली में सोशल मीडिया रीलों से गैंगस्टर संस्कृति के प्रति युवाओं का आकर्षण बढ़ रहा है, जिससे आपराधिक व्यवहार बढ़ रहा है। परित्यक्त इमारतें नशीली दवाओं के उपयोग और अपराध दृश्यों के मंचन का केंद्र बन गई हैं। नागरिक बढ़ते अपराध को रोकने के लिए सख्त पुलिस कार्रवाई, सीसीटीवी निगरानी और परित्यक्त संपत्तियों को सुरक्षित करने की मांग करते हैं।

Web Title : Gangster Culture Attracts Youth, Reels Fuel Crime in Sangli

Web Summary : Sangli grapples with youth's fascination with gangster culture fueled by social media reels, leading to criminal behavior. Abandoned buildings become hubs for drug use and staged crime scenes. Citizens demand stricter police action, CCTV surveillance, and securing derelict properties to curb rising crime.