Sangli: तुरुंगात मिळाले पैसा छापण्याचे ज्ञान अन् पोलिसाच्या मदतीने थाटले दुकान, १ कोटीच्या बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 13:35 IST2025-10-11T13:29:44+5:302025-10-11T13:35:29+5:30
सिद्धकला चहा कंपनीत नोटा छापण्याची कला

Sangli: तुरुंगात मिळाले पैसा छापण्याचे ज्ञान अन् पोलिसाच्या मदतीने थाटले दुकान, १ कोटीच्या बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
सदानंद औंधे
मिरज : मिरजेत सापडलेल्या बनावट नोटा छापणाऱ्या टोळीची कथा एखाद्या चित्रपटाला साजेशी आहे. टोळीतील आरोपी राहुल जाधव याने गांजा तस्करी प्रकरणात तुरुंगात असताना त्या ठिकाणच्या गुन्हेगारांकडून बनावट नोटा छपाईचे ‘ज्ञान’ घेतले. मित्र असलेला पोलिस इब्रार याला त्याने या काळ्या उद्योगाची ‘आयडिया’ दिली. पोलिसानेही लगेच त्याच्या सिद्धकला चहा कंपनीच्या दुकानात बनावट नोटा छपाईची ‘कला’ सुरू केली. सहा महिने बिनबोभाट चाललेल्या या काळ्या उद्योगाचा मिरज पोलिसांनी अखेर पर्दाफाश केला.
पोलिसांनी अटक केलेला हवालदार इब्रार इनामदार व नरेंद्र शिंदे यांची कोल्हापुरात सिद्धकला ही चहाची कंपनी आहे. सिद्धकला या नावाने कोल्हापुरात आठ ते दहा ठिकाणी त्यांची फ्रेंचाईजी सुरू आहे. इब्रार हा गेली वीस वर्षे पोलिस दलात वाहन चालक म्हणून काम करीत असल्याने राहुल जाधव या गुन्हेगारासोबत त्याची ओळख झाली. राहुल जाधव यांच्याविरुद्ध जबरी चोरी, गांजा तस्करी यासह अनेक गुन्हे आहेत.
वाचा- कोल्हापुरातील पोलिसाच्या चहा दुकानात छापल्या १ कोटीच्या बनावट नोटा, मिरजेत पाचजणांना अटक
तुरुंगात असताना राहुल याने बनावट नोटा निर्मितीचे ज्ञान घेतले. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राहुल जाधव याने इब्रार इनामदार यास बनावट नोटा छापण्याची आयडिया दिली. इब्रार याने चहा व्यवसायातील भागीदार असलेल्या नरेंद्र शिंदे यास बनावट नोटाच्या उद्योगात भागीदार होण्यासाठी तयार केले. त्यानंतर गेले सहा महिने दोघांनी सिद्धकला चहाचे कार्यालय असलेल्या ठिकाणी कलर झेरॉक्स मशीन, स्कॅनर, प्रिंटर आणून राहुल जाधव व इब्रार या दोघांनी बनावट नोटा छापण्यास सुरुवात केली.
२५ हजारांत लाखाच्या बनावट नोटा
चहा कंपनीच्या नावाखाली बनावट नोटांचा उद्योग सुरू झाल्यानंतर या नोटा खपवण्यासाठी सुप्रीत देसाई यास दोघांनी हाताशी धरले. सुप्रीत हा इब्रार व नरेंद्र शिंदे यांच्याकडून २५ हजारांत एक लाख किमतीच्या बनावट नोटा खरेदी करीत होता. पुढे तो ५० हजारांना १ लाखाच्या नोटांचे वितरण करीत होता.
पोलिसांनी केली आयडिया अन् सारे जाळ्यात
मिरजेत गांधी चौक पोलिस ठाण्याचे साहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे यांना दोन बनावट नोटा सापडल्यानंतर त्याचे वितरण सुप्रीत हा करीत असल्याचे समजले. बनावट नोटा विक्री करणाऱ्या सुप्रीत याच्याकडून नोटा खरेदी करण्यासाठी पोलिसांनी बनावट गिऱ्हाईकाद्वारे संपर्क साधून सापळा रचून त्यास मिरजेत पकडले. त्यानंतर ही टोळी उघडकीस आली.
मुंबईतही होते वितरण
या टोळीकडून छापण्यात येणाऱ्या बनावट नोटा मुंबईत वितरित करण्यासाठी सिद्धेश म्हात्रे याला टोळीत घेतल्याचे पोलिसांना समजले. सिद्धेश म्हात्रे यास इस्लामपूर येथे सापळा रचून पोलिसांनी ताब्यात घेऊन गाडीतून तब्बल ९७ लाखांच्या बनावट नोटा हस्तगत केल्या.
आजारी रजा घेऊन नोटा छापल्या
इब्रार इनामदार हा आजारी रजा घेऊन गेला महिनाभर सिद्धकला चहा कंपनीच्या कार्यालयात नोटा छापण्याचा उद्योग करीत होता. त्याला पोलिसांनी अटक केली असून, खात्यांतर्गत कारवाईची शिफारसही केली आहे.