अशोक पाटीलइस्लामपूर : इस्लामपूर-शिराळा मतदार संघातील दिग्गज नेत्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतील सूत्रे विविध पक्षातील जिल्हाध्यक्ष यांच्याकडेच सोपवले. तरीसुध्दा आमदार जयंत पाटील, माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्याकडे विविध संस्थांची ताकत आहे. त्यामुळेच इस्लामपूर-शिराळा मतदार संघातील दिग्गज नेत्यापुढे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे आव्हान उभे ठाकले आहे. त्यामुळे दिग्गज नेत्यांची कसोटी लागणार आहे.आमदार जयंत पाटील आणि माजी आमदार मानसिंगराव नाईक यांची भूमिका तुतारी फुंकणाऱ्या माणूस चिन्हाभावेती घुटमळत असली तरीसुध्दा शिराळा भागातील विकासाला गती देण्यासाठी मानसिंगराव नाईक यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपर्काचा धागा पकडला आहे. त्यामुळेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आ. जयंत पाटील आणि मानसिंगराव नाईक यांची आपल्या भूमिकेविषयी कसोटी पणाला लागणार आहे.नुकतेच माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी इस्लामपूर शिराळा -मतदार संघातील साखर सम्राट आमदार जयंत पाटील आणि मानसिंगराव नाईक यांचा नाद सोडून महाराष्ट्रातील साखर उद्योगावर पकड असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गोटात सामील होऊन पुन्हा एकदा आपल्या गटाला पुनरुज्जीवित करण्याचा डाव आखला असला तरी शिवाजीराव नाईक यांच्या राजकीय अस्तित्वाचे बरेच पाणी पुलाखालून वाहून गेले आहे. त्यामुळे शिवाजीराव नाईक यांची आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कसोटी लागणार आहे.एकंदरीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी बाळकडू पाजून तयार केलेल्या आमदार जयंत पाटील, शिवाजीराव नाईक, मानसिंगराव नाईक यांना आपली भूमिका पार पाडताना आगामी काळात कसोटी पणाला लावावी लागेल.मानसिंगराव नाईक यांची भूमिका महत्त्वाची ठरणारइस्लामपूर-शिराळा मतदार संघात भाजप पुरस्कृत आमदार सदाभाऊ खोत, आमदार सत्यजित देशमुख, राहुल महाडिक, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक राष्ट्रवादीचे माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, शिंदे सेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार, गौरव नायकवडी डिग्रज मंडल मधील भीमराव माने यांचे आमदार जयंत पाटील यांना तगडे आवाहन असले तरी अंतिम टप्प्यात मानसिंगराव नाईक यांची भूमिका महत्त्वाची ठरेल.
Sangli: इस्लामपूर-शिराळा मतदारसंघात दिग्ग्ज नेत्यांची कसोटी, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 18:42 IST