Sangli: अंकली ते चोकाक रस्ता चौपदरीकरणाची निविदा मंजूर, गेल्या काही वर्षांपासून रखडले होते काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 12:13 IST2025-01-09T12:12:18+5:302025-01-09T12:13:13+5:30
कामाला लवकरच मुहूर्त

Sangli: अंकली ते चोकाक रस्ता चौपदरीकरणाची निविदा मंजूर, गेल्या काही वर्षांपासून रखडले होते काम
सांगली : कोल्हापूर जिल्ह्यातील चोकाक ते अंकली (ता. मिरज) दरम्यान राष्ट्रीय महामार्ग १६६ च्या चौपदरीकरण कामासाठी दाखल झालेल्या निविदा नुकत्याच खुल्या करण्यात आल्या. सर्वात कमी दराची निविदा म्हणून श्री अवंतिका कन्स्ट्रक्शन कंपनीला काम मिळाले आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या या महामार्गाचे काम आता मार्गी लागणार आहे.
जमीन अधिग्रहणाच्या कामामुळे हे काम बराच काळ रेंगाळले होते. हातकणंगले तालुक्यातील मजले, चोकाक, अतिग्रे, माणगाववाडी, शिरोळ तालुक्यातील जैनापूर, उमळवाड, उदगाव, तंदलगे, निमशिरगाव या नऊ गावातील ५३० मिळकतधारकांच्या मिळकती अधिग्रहित करण्यात येणार होत्या.
मोबदला व अन्य काही मागण्यांसाठी मिळकतदारांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर काही काळ काम रेंगाळले होते. हा प्रश्न आता संपुष्टात आल्यानंतर चोकाक ते सांगली या मार्गाच्या कामासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. देशभरातील १२ कंपन्यांनी निविदा दाखल केल्या होत्या. त्यात सर्वात कमी दराची निविदा म्हणून श्री अवंतिका कंपनीला काम मिळाले आहे.
६९६ कोटी रुपयांची निविदा
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ७५८ कोटी ७५ लाख अशी प्रकल्प किंमत निश्चित केली होती. श्री अवंतिका कंपनीने ८.१४ टक्के कमी दराने म्हणजेच ६९६ कोटी ९६ लाख रुपयांची निविदा दाखल केली होती. त्यामुळे त्यांना काम मिळाले.
३३ किलोमीटर अंतराचे काम
चोकाकपासून निमशिरगाव, जैनापूर, अंकली असा चौपदरीकरणाचा मार्ग आहे. या कामासाठी दोन वर्षाची मुदत देण्यात आली असून एकूण ३३.६० किलोमीटर अंतराचे हे काम आहे.
खड्डेमय रस्त्यावरुन नागरिकांची कसरत
सध्या कोल्हापूर ते सांगली मार्ग खड्डेमय बनला आहे. चोकाकपासून अंकलीपर्यंतचा रस्ता तर कसरतीचा बनला आहे. चौपदरीकरणाच्या कामानंतर वाहनधारकांना दिलासा मिळणार असून या मार्गावरील प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.
पूरपट्ट्यातील रस्ता
सध्याच्या महामार्गाचे काम ज्या गावांमधून होणार आहे त्यातील बहुतांश गावे ही पूरपट्ट्यातील आहेत. त्यामुळे महापुराच्या पाण्याचा स्तर विचारात घेऊन महामार्गाच्या चौपदरीकरणाचे तसेच नदीवरील पुलाचे काम करावे, अशी अपेक्षा पूरपट्ट्यातील नागरिकांतून होत आहे.
मंजूर झालेले काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे. टोलच्या माध्यमातून पैसे घेत असताना नागरिकांना पुराचा किंवा कोणत्याही नैसर्गिक आपत्तीत त्रास होणार नाही व दीर्घकाळ रस्ता टिकावा, याद्ष्टीने कामाचे नियोजन करावे. - सतिश साखळकर, नागरिक जागृती मंच, सांगली