Sangli: पेपर तपासणीत शिक्षकांचीच परीक्षा, कमी दिवसामध्ये निकाल लावण्याचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 15:47 IST2025-04-29T15:46:25+5:302025-04-29T15:47:01+5:30
सांगली : पहिली ते नववीपर्यंतच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा शुक्रवारी (दि. २५) संपल्या. १ मे रोजी ...

Sangli: पेपर तपासणीत शिक्षकांचीच परीक्षा, कमी दिवसामध्ये निकाल लावण्याचे आव्हान
सांगली : पहिली ते नववीपर्यंतच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा शुक्रवारी (दि. २५) संपल्या. १ मे रोजी परीक्षांचा निकाल जाहीर करायचा आहे. त्यामुळे अवघ्या पाच दिवसांत पेपर तपासण्याचे दिव्य शिक्षकांना करावे लागणार आहे.
गेली काही वर्षे एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात अंतिम सत्र परीक्षा होत होत्या. शैक्षणिक वर्षात किमान २२० दिवस अध्यापन व्हावे, असा नियम आहे. त्याचे पालन होत नव्हते. त्यामुळे यंदा प्रथमच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) सर्वच शाळांच्या अंतिम सत्र परीक्षेच्या तारखा निश्चित केल्या. त्यानुसार ८ ते २५ एप्रिलदरम्यान राज्यभरात एकाचवेळी पहिली ते नववीच्या परीक्षा झाल्या. त्यानंतर १ मे रोजी निकाल जाहीर करायचा आहे. त्यामुळे पेपर तपासणीसाठी फक्त ५ दिवसांचा कालावधी शिक्षकांच्या हातात आहे.
उत्तरपत्रिका तपासून निकाल पत्रक तयार करण्यासाठी तारेवरील कसरत करावी लागणार आहे. विद्यार्थ्यांचे गुण पोर्टलवर अपलोड करायचे आहेत, त्यानंतर त्याचे निकालपत्रही तयार करायचे आहे. याच कालावधीत संकलित चाचणी (पॅट) परीक्षाही झाली आहे, तिचे गुण ऑनलाइन प्रणालीवर अपलोड करायचे आहेत. यामुळे शिक्षकांची एकच धांदल उडाली आहे. कमी पटसंख्येच्या छोट्या शाळांच्या तुलनेत मोठ्या पटसंख्येच्या शाळांमध्ये शिक्षकांची तारांबळ उडाली आहे. वार्षिक परीक्षा असल्याने अत्यंत बारकाईने पेपर तपासणी व निकालाची प्रक्रिया राबवावी लागणार आहे.
सुटी एका दिवसाने घटली
दरवर्षी निकाल जाहीर झाल्यानंतर शाळांना उन्हाळा सुटी लागते, पण यंदा रमजान ईदची सुटी अतिरिक्त झाल्याने सुटी एक दिवस लांबणार असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी सांगितले. उन्हाळी सुट्यानंतर १५ जून रोजी शाळा सुरू होणार आहेत. परीक्षा लांबल्याने विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्याही कमी झाल्या आहेत. चालू शैक्षणिक वर्षातील अंतिम सत्र परीक्षा २५ एप्रिल रोजी संपल्यानंतर विद्यार्थ्यांना उन्हाळा सुट्या लागल्या आहेत.