Sangli Politics: ..त्यामुळेच सत्ता गेली; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीबाबत रोहित पाटलांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले..
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 18:50 IST2026-01-24T18:47:31+5:302026-01-24T18:50:08+5:30
आम्ही ताकदीने तासगाव–कवठेमहांकाळ तालुक्यातील निवडणुका लढवणार

Sangli Politics: ..त्यामुळेच सत्ता गेली; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीबाबत रोहित पाटलांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले..
तासगाव : तासगाव शहरात झालेले बोगस मतदान, अमाप पैसा आणि किरकोळ बंडखोरी यामुळे आमची सत्ता गेली. मात्र, शहरातील जनता आमच्याच सोबत राहिली, असे आमदार रोहित पाटील यांनी तासगाव येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका तासगाव–कवठेमहांकाळ तालुक्यात स्वतंत्रपणे तुतारीच्या चिन्हावरच लढवणार असल्याचेही आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.
आमदार रोहित पाटील म्हणाले, तासगाव शहरातील निवडणुकीत तब्बल १,४९१ बोगस मतदार होते. या निवडणुकीसाठी मांजर्डे, पेड, हातनोली, हातनूर, सांगली, सांगलीवाडी या ठिकाणांहून मतदार आणून ९५० बोगस मतदान करण्यात आले. बंडखोर उमेदवार, क्रॉस व्होटिंग आणि धनशक्तीच्या वापरामुळे त्याचा फटका आम्हाला बसला आणि आमचा पराभव झाला. अत्यंत साध्या घरातील उमेदवार आम्ही उभे केले, तरीही आम्ही पराभव प्रामाणिकपणे स्वीकारला आहे.
ते पुढे म्हणाले, आघाडीत चर्चा झाली होती की तुतारी आणि घड्याळ एकत्र येत आहेत. अशा वावड्यांमुळे कार्यकर्त्यांमध्ये गैरसमज निर्माण झाला. विधानसभेत तुतारी आणि घड्याळ प्रत्यक्षात आमने–सामने आहेत. त्यामुळे या दोन चिन्हांची एकत्र लढत कार्यकर्त्यांना मान्य नव्हती. आम्ही या भावना नेतृत्वापर्यंत पोहोचवल्या आणि नेतृत्वाने आम्हाला तुतारी चिन्हावर स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय दिला आहे. आम्ही ताकदीने तासगाव–कवठेमहांकाळ तालुक्यातील निवडणुका लढवणार आहोत. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील, बाजार समितीचे माजी सभापती अविनाश पाटील, सभापती युवराज पाटील, तसेच जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष शंकर पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.