Sangli Crime: संख येथील युवकाचा संशयास्पद मृत्यू, खंडनाळ रस्त्यावर आढळला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 19:05 IST2025-11-14T19:03:36+5:302025-11-14T19:05:04+5:30
शेती करून द्राक्षबाग सांभाळत होता

Sangli Crime: संख येथील युवकाचा संशयास्पद मृत्यू, खंडनाळ रस्त्यावर आढळला मृतदेह
दरीबडची : संख (ता. जत) येथील युवकाचा खंडनाळ गावाच्या हद्दीत रस्त्याकडेला असलेल्या पडीक शेतात संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळला. मृत युवकाचे नाव रामू ऊर्फ रामाण्णा विठ्ठल गायकवाड (वय ३४) आहे. तो रात्री साडे आठ वाजता घरातून बाहेर पडला होता. गुरुवारी सकाळी सात वाजता रस्त्याकडेला त्याचा मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मृत रामू हा बुधवारी रात्री साडे आठ वाजता संखला जाऊन येतो, असे सांगून घरातून बाहेर पडला होता. मात्र, रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नाही. गुरुवारी सकाळी सात वाजता रामचंद्र चिंचोलकर यांच्या पडीक शेताजवळ रस्त्याकडेला त्याचा मृतदेह आढळला.
रामू हा संख-खंडनाळ भागातील शेतात आई-वडील, भाऊ आणि भावजय यांच्यासह राहत होता. त्याच्या कुटुंबाकडे द्राक्षबाग आहे. सहा वर्षांपूर्वी लग्न झाले असून, त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. रामू शेती करून द्राक्षबाग सांभाळत होता. घटनेच्या दिवशी महिला शेतीकामासाठी जाणार होत्या. रामू त्यांना गाडीवरून सोडण्यासाठी गावाकडे गेला होता.
घटनेची माहिती मिळताच उमदी पोलिस ठाण्याचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे आणि उपनिरीक्षक संजू जाधव यांनी भेट दिली.
मृत्यूचे कारण अस्पष्ट : खुनाची चर्चा
पोलिसांच्या प्राथमिक तपासात रामूच्या मृत्यूचे खरे कारण उशिरापर्यंत स्पष्ट झालेले नव्हते. मात्र घटनास्थळी हा खून झाल्याची चर्चा सुरू होती. नातेवाइकांनी रामूचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. हवालदार लक्ष्मण बंडगर प्राथमिक तपास करीत आहेत.