Sangli: चार महिन्यांपूर्वी प्रेयसीसोबत पलायन केले, रांजणी येथे युवकाचा संशयास्पद मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 18:56 IST2025-06-20T18:56:01+5:302025-06-20T18:56:16+5:30

खून करून आत्महत्या भासवण्याचा संशय

Suspicious death of a young man in Ranjani Sangli district who had eloped with his girlfriend four months ago | Sangli: चार महिन्यांपूर्वी प्रेयसीसोबत पलायन केले, रांजणी येथे युवकाचा संशयास्पद मृत्यू

Sangli: चार महिन्यांपूर्वी प्रेयसीसोबत पलायन केले, रांजणी येथे युवकाचा संशयास्पद मृत्यू

कवठेमहांकाळ : रांजणी (ता. कवठेमहांकाळ) येथील वन विभागाच्या कुरणात एका युवकाचा मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. गणेश राजू शिवपुजे (वय २२, रा. खिळेगाव, ता. अथणी), असे मयत युवकाचे नाव आहे. घटनास्थळाच्या पाहणीनंतर गणेश याचा खून करून आत्महत्या भासवण्याचा प्रयत्न केला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गणेश शिवपुजे याने चार महिन्यांपूर्वी आपल्या प्रेयसीसोबत गावातून पलायन केले होते. गेल्या चार महिन्यांपासून प्रेमीयुगुल बेपत्ता होते. मात्र, गेल्या महिनाभरापूर्वी त्याने आपल्या प्रेयसीला खिळेगाव या आपल्या मूळगावी आणून सोडले होते. त्याची प्रेयसी अल्पवयीन असल्याने त्याच्यावर अथणी येथील पोलिस ठाण्यामध्ये पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल होता. चार महिन्यांपासून अथणी पोलिस त्याचा शोध घेत होते. मात्र, त्याचा पत्ता लागत नव्हता. 

मात्र, गुरुवारी सकाळी रांजणी येथील कुरणामध्ये गणेश शिवपुजे याचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. याची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना दिली. त्यानंतर तात्काळ, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे, पोलिस निरीक्षक ज्योतीराम पाटील, सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. 

मृतदेह लटकावल्याचा पोलिसांचा संशय 

घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर ही घटना संशयास्पद असून, मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत असला तरी मृतदेहाचे दोन्ही हात हेडफोनच्या वायरने बांधलेले होते. त्याचा शर्ट फाटलेला होता. पायात एक दोरी पडलेली होती, अशी एकूण संशयास्पद परिस्थिती पाहता युवकाचा खून करून मृतदेह लटकावला असल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीनंतर अधिक तपशील समजू शकणार आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Suspicious death of a young man in Ranjani Sangli district who had eloped with his girlfriend four months ago