शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूरला, अधिसभेत ठराव मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2023 01:33 PM2023-12-23T13:33:29+5:302023-12-23T13:33:48+5:30

अॅड. वैभव पाटील यांच्या प्रयत्नांना यश

Sub centre of Shivaji University to Khanapur | शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूरला, अधिसभेत ठराव मंजूर

शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूरला, अधिसभेत ठराव मंजूर

विटा : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथेच व्हावे, यासाठी विद्यापीठाच्या अधिसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी मांडलेल्या ठरावाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. शिवाजी विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य व भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनीही या ठरावाला पाठिंबा दिला.

शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे व्हावे, यासाठी गेल्या काही वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या ॲड. वैभव पाटील यांनीही ही मागणी लावून धरली होती. शुक्रवारी शिवाजी विद्यापीठाची अधिसभा झाली. यावेळी पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील खानापूर, आटपाडी, तासगाव, कडेगाव, कवठेमहांकाळ, जत व पलूस, तसेच सोलापूर जिल्ह्यातील सांगोला आणि सातारा जिल्ह्यातील खटाव, माण व फलटण या दुष्काळी तालुक्यांतील विद्यार्थी व पालक यांच्या सोयीसाठी खानापूर येथेच शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र व्हावे, यासाठीचा ठराव सभेत मांडला.

या ठरावाला प्राध्यापक संघटना, विद्यापीठ विकास आघाडी, विकास मंच यांनी सर्वानुमते पाठिंबा दिला. विशेष म्हणजे, ठरावाला भाजपचे गोपीचंद पडळकर यांनी पाठिंबा दिला. जिल्ह्याचे सुटा अध्यक्ष प्रा. निवास वरेकर, संजय परमाणष, प्रा. गायकवाड यांनीही अभ्यासपूर्ण मते मांडली.

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या खानापूर येथील विद्यापीठ उपकेंद्राच्या मागणीचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. अधिसभेच्या मंजुरीनंतर हा ठराव शासनाकडे जाणार असून, तेथे अंतिम मंजुरी मिळेल. त्यासाठी केलेल्या प्रयत्नाला पहिल्या टप्प्यात यश आल्याचे समाधान वाटते. - ॲड. वैभव पाटील, सदस्य, शिवाजी विद्यापीठ अधिसभा

Web Title: Sub centre of Shivaji University to Khanapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.