सांगली : दहावीच्या परीक्षांचा निकाल जाहीर होऊन आठवडा होत आला, तरी अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा) आणि आयटीआय या व्यावसायिक शिक्षणक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. शिक्षण मंडळांनी वेळापत्रक नसल्याने महाविद्यालयांनी तूर्त विद्यार्थ्यांच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू ठेवली आहे.
दहावीचा निकाल लागण्यापूर्वीच अकरावी प्रवेशासाठी पहिला भाग नोंदविण्याचे ऑनलाइन काम सुरू झाले होते. निकालानंतर दुसऱ्या भागाचीही प्रक्रिया सुरू झाली. डिप्लोमा आणि अकरावीच्या वेळापत्रकाची मात्र विद्यार्थ्यांना अद्याप प्रतीक्षाच आहे. या कौशल्य विकास अभ्यासक्रमांच्या प्रवेशाला इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांचे डोळे वेळापत्रकाकडे लागले आहेत.
गेल्या काही वर्षांत डिप्लोमा प्रवेशाला घसरण लागल्याने एकेक विद्यार्थी मिळवण्यासाठी शिक्षण संस्थांना कसरत करावी लागते. खासगी आयटीआयची अवस्थाही अशीच आहे या स्थितीत प्रवेश प्रक्रिया सुरू न झाल्याने विद्यार्थी दुरावणे किंवा अन्य शिक्षणक्रमांकडे वळणे या शिक्षणसंस्थांसाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची नोंदणी करून त्यांना थांबवून ठेवण्याचा खटाटोप महाविद्यालयांना करावा लागत आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर प्रवेशाचे वेळापत्रक, नोंदणी प्रक्रिया किंवा संभाव्य तारखांबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही.
त्यामुळे विद्यार्थी तूर्त अकरावीच्या प्रवेशासाठी नोंदणी करत आहेत. गतवर्षी तंत्रशिक्षण संचालनालयाने दहावीचा निकाल लागण्यापूर्वीच ऑनलाइन लिंक उपलब्ध करुन दिली होती. यावर्षी मात्र विलंब झाल्याचे दिसत आहे.
प्रक्रिया बुधवारपासून?
दरम्यान, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी समाजमाध्यमांवर प्रथम वर्ष पदविका प्रवेश प्रक्रिया बुधवारपासून (दि. २०) सुरू होईल, अशी माहिती दिली. अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी संचालनालयाच्या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन त्यांनी केले.
मुलग्यासाठी डिप्लोमाला प्रवेश घ्यायचा आहे, मात्र प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली नसल्याने सध्या कागदपत्रांची जमवाजमव करत आहोत. अकरावीसाठीही प्रवेश नोंदणी करून ठेवली आहे. - सद्दाम मकानदार, पालक
डिप्लोमा प्रवेशाची प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे. पालक व विद्यार्थी आमच्याकडे चौकशीसाठी येत आहेत. त्यांची नोंदणी करून ठेवत आहोत. तंत्रशिक्षण संचालनालयाकडून प्रक्रिया जाहीर होताच कळवू असे पालकांना सांगितले आहे. तोपर्यंत त्यांनी सर्व कागदपत्रांची तयारी करून ठेवावी. - अण्णासाहेब गाजी, प्राचार्य, लठ्ठे तंत्रनिकेतन
Web Summary : Students await diploma and ITI admission schedules post-tenth grade results. Colleges started registrations, but official dates are pending. Minister announced Wednesday's start; students register for 11th grade.
Web Summary : दसवीं के परिणाम के बाद भी डिप्लोमा और आईटीआई में प्रवेश के लिए छात्र समय सारिणी का इंतजार कर रहे हैं। कॉलेजों ने पंजीकरण शुरू कर दिया है, लेकिन आधिकारिक तारीखें अभी बाकी हैं। मंत्री ने बुधवार से शुरुआत की घोषणा की; छात्र 11वीं कक्षा के लिए पंजीकरण करा रहे हैं।