सांगली : जिल्हा पोलीस दलाच्यावतीने विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत जप्त केलेला ७५२ किलो गांजा व ६२२५ किलो अफूच्या झाडांचा साठा शुक्रवारी नष्ट करण्यात आला. खंडेराजुरी (ता. मिरज) येथील गोळीबार मैदानावर पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही कार्यवाही झाली.
न्यायालयाच्या निर्देशानुसार जप्त अमली पदार्थाचा साठा नष्ट करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अपर अधीक्षक मनीषा दुबुले आणि पोलीस उपअधीक्षक किशोर काळे यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील ११ पोलीस ठाण्यात अमली पदार्थविषयक २३ गु्न्हे दाखल करण्यात आले हाेतेे. यात ७५२ किलो गांजा व शिराळा तालुक्यात जप्त करण्यात आलेली ६२२५ किलो अफूची झाडे हा मुद्देमाल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नष्ट करण्यात आला.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड, उपनिरीक्षक अभिजित सावंत यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.