Sangli: बनावट सोने तारण ठेवून सलग दहा वर्षे स्टेट बँकेची फसवणूक, पलूसमधील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 12:16 IST2025-08-01T12:15:59+5:302025-08-01T12:16:40+5:30
तिघांवर गुन्हा; जुनेच सोने प्रत्येकवेळी तारण

संग्रहित छाया
पलूस : येथील स्टेट बँकेच्या शाखेत बनावट सोने तारण ठेवून ७ लाख ६० हजारांचे कर्ज काढून बँकेची सलग दहा वर्षे फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत राजेंद्र विठ्ठलराव यादव (रा. रामापूर, ता. कडेगाव), राजेंद्र संपतराव शिंदे (रा. पलूस), सुधाकर शिवाजी सूर्यवंशी (रा. पलूस) या तिघांविरुद्ध पलूस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बँकेचे शाखाधिकारी गोरख पाखरे (रा. पलूस) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित राजेंद्र यादव हा स्टेट बँकेचा कर्जदार आहे. २०१५ मध्ये त्याने सोने तारण कर्जाची मागणी केली. त्यासाठी त्याने २०४.१३ ग्रॅम वजनाचे दागिने दिले होते. बँकेकडील सोने तपासणारे सराफ राजेंद्रकुमार शिंदे यांना सोन्याची किंमत व शुद्धता पडताळणीसाठी बँकेत बोलावले. शिंदे याने सोन्याची शुद्धता २२ कॅरेट असल्याबाबत प्रमाणपत्र दिले. त्यामुळे बँकेने कर्जदार यादव याला १ लाख ९० हजार रुपयांचे कर्ज दिले. त्यानंतर यादव याने नऊवेळा जुनी कर्जप्रकरणे बंद करून त्याच दागिन्यांवर नवीन कर्ज घेतले.
२०२४ मध्ये त्याच दागिन्यांवर यादव याने ४ लाख ३२ हजार रुपये व ३ लाख २८ हजार रुपये कर्ज घेतले. या कर्ज प्रकरणावेळी सराफ राजेंद्रकुमार शिंदे व सुधाकर सूर्यवंशी यांनी शुद्धता प्रमाणपत्र बँकेला दिले. त्यानंतर दि. १६ मे २०२५ रोजी यादव याने पुन्हा जुने कर्ज प्रकरण बंद करून नवीन कर्जाची मागणी केली.
बँकेने अधिकृत सराफ मुकुंद दीक्षित यांना दागिने पडताळणीसाठी बोलावले. दीक्षित यांना सोन्याच्या शुद्धतेबाबत शंका आली. कर्जदार यादव याला सोन्याची अधिक शुद्धता तपासावी लागेल, असे सांगितले. तेव्हा यादव याने महत्त्वाचे काम असल्याचे सांगून काढता पाय घेतला. त्यानंतर बँकेत येण्यास टाळाटाळ केली.
दि. २३ मे रोजी कर्जदार यादव बँकेत आला. त्यावेळी सराफ दीक्षित यांच्यासमक्ष सोन्याची शुद्धता पडताळणी केली. तेव्हा सोने खोटे असल्याचे स्पष्ट झाले. यादव याने सराफ राजेंद्रकुमार शिंदे, सुधाकर शिंदे या दोघांना हाताशी धरून खोटे दागिने खरे असल्याचे भासवून बँकेची ७ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केल्याबद्दल शाखाधिकारी पाखरे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
जुन्या सोन्यावरच फसवणुकीचा फंडा
कर्जदार यादव हा २०१५ पासून बँकेतून सोने तारण कर्ज घेत होता. तसेच दोघे सराफ बँकेत तारण असलेले सोने शुद्ध असल्याचे प्रमाणपत्र देत होते. सोन्याच्या किमतीत वाढ झाल्यामुळे तारण कर्जाची रक्कमही तो प्रत्येकवेळी वाढवत होता.