Sangli: पलूसमध्ये भरधाव टेम्पो दुकानांत घुसला, धडकेत एकजण गंभीर जखमी; मद्यधुंद चालकाला चोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 12:54 IST2025-09-15T12:53:45+5:302025-09-15T12:54:10+5:30
कराड-तासगाव महामार्गावर पलूस पोलिस स्टेशनजवळ भवधाव टेम्पो दुकान गाळ्यांमध्ये घुसून नुकसान झाले.

Sangli: पलूसमध्ये भरधाव टेम्पो दुकानांत घुसला, धडकेत एकजण गंभीर जखमी; मद्यधुंद चालकाला चोप
पलूस: कराड-तासगाव महामार्गावर पलूस पोलिस स्टेशनजवळ टेम्पोच्या धडकेत एकजण गंभीर जखमी झाला. तसेच दुकानांच्या गाळ्यांमध्ये टेम्पो घुसल्याने अंदाजे तीन लाखांचे नुकसान झाले आहे. ही घटना रविवार रात्री घडली. जखमी व्यक्तीस उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिथून त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, नाशिककडे जाणारा टेम्पोत एका लोखंडी कारखान्याचे साहित्य भरून तासगाव दिशेने निघाला होता. पलूस पोलिस स्टेशनजवळ, दत्त भवन पानशॉपजवळ हा टेम्पो भरधाव वेगाने जात असताना अचानक चालकाचा ताबा सुटून रस्त्याने चाललेल्या एका व्यक्तीला जोरदार धडकल्याने ती व्यक्ती गंभीर जखमी झाली. जखमी व्यक्तीचे नाव अद्याप समजू शकलेले नाही, मात्र तो पेठवडगाव (ता. हातकणंगले) येथील एका हॉटेलमधील वेटर असल्याचे समजले आहे.
या व्यक्तीला धडक दिल्यानंतर टेम्पो दत्त भवन पानशॉप आणि शेजारच्या एका दुकानाला धडकला. दोन्ही दुकानांच्या गाळ्यांचे शटर तोडून टेम्पो आत घुसला. पुढे टेम्पो दुसऱ्या दिशेने गेला आणि लोखंडी खांबाला धडकून थांबला. या दुर्घटनेत टेम्पो आणि दोन्ही दुकानांचे अंदाजे तीन लाखांचे नुकसान झाले आहे.
टेम्पोचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे आढळून आले. नागरिकांनी त्याला मारहाण करत पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पलूस पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, मात्र पोलिसांनी पुढील तपास सुरू ठेवला आहे.