Sangli: औषधांच्या नावाखाली बनावट गोवानिर्मित देशी दारूची तस्करी, मिरजेत ७१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 11:30 IST2026-03-03T11:30:18+5:302026-03-03T11:30:49+5:30
चालकाने कंटेनरमध्ये औषधे असल्याचे सांगून औषधांची बोगस बिले दाखवली.

Sangli: औषधांच्या नावाखाली बनावट गोवानिर्मित देशी दारूची तस्करी, मिरजेत ७१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
मिरज : औषधांच्या नावाखाली गोवा राज्य निर्मित बनावट देशी दारूची तस्करी करणारा कंटेनर मिरजेत राज्य उत्पादन शुल्क विभागाने पकडला असून, ४१ लाख ३६ हजार रुपयांचा मद्यसाठा आणि कंटेनर मिळून ७१ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी कंटेनर चालकाला अटक करण्यात आली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक दीपक सुपे यांच्या पथकाने रविवारी सकाळी ७ वाजता मिरज-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील म्हैशाळ फाट्याजवळ गुप्त माहितीच्या आधारे औषधांच्या नावाखाली गोवा दारू तस्करी करणारा कंटेनर पकडण्यासाठी सापळा रचला. एमएच. ४०, सीटी. २८१४ या क्रमांकाचा दहा चाकी कंटेनर अडवण्यात आला. यावेळी चालकाने कंटेनरमध्ये औषधे असल्याचे सांगून औषधांची बोगस बिले दाखवली.
परंतु वाहनाची तपासणी केली असता महाराष्ट्र राज्याचा महसूल चुकवून आणलेला विविध प्रकारचा देशी दारू साठा आढळला. कंटेनरमध्ये ‘कोंकण संत्रा ९९९’, ‘रॉकेट संत्रा’, ‘सिमला संत्रा’ आणि ‘गोवा नं. १ संत्रा’ या नावाचा देशी दारू साठा आढळला. या मद्यसाठ्याची किंमत ४१ लाख ३६ हजार रुपये आहे. वाहनात एमएच. ४६, बीएम. ५७५१ आणि डब्ल्यूबी. २३, एफ. ७८७६ या बनावट नंबर प्लेटही आढळल्या.
अरिस्टो फार्मास्युटिकल्स प्रा. लि., भोपाल, निकिता फार्मास्युटिकल्स, नागपूर आणि रुसन फार्मा लिमिटेड, अंकलेश्वर (गुजरात) या कंपन्यांच्या नावाने बनावट औषधांची बिले सापडली. औषधांच्या आडून दारूची तस्करी राज्य उत्पादन शुल्क विभागाने उघडकीस आणली.
याप्रकरणी लभजित गुरमेज सिंह (वय ३२, रा. पिलभित, उत्तर प्रदेश) याला अटक करण्यात आली आहे. त्याने दारूसाठा गोवा राज्यातून आणून नागपूर येथे घेऊन जाणार असल्याची कबुली दिली. आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. निरीक्षक दीपक सुपे यांच्या नेतृत्वाखाली दुय्यम निरीक्षक लक्ष्मण पोवार, अजय लोंढे, जयसिंग खुटावळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास निरीक्षक सुपे करत आहेत.