सांगली जि.प.मध्ये नवा पट, नवी समीकरणे; नेत्यांच्या पक्षांतराने बदलणार राजकीय चित्र

By संतोष भिसे | Updated: July 8, 2025 19:19 IST2025-07-08T19:17:13+5:302025-07-08T19:19:53+5:30

मिरज, आटपाडी, जत, तासगाव, शिराळ्यात काटा लढतीची चिन्हे, खानापुरातही राजकीय अस्तित्वाच्या लढती

Signs of a close contest in Miraj Atpadi Jat Tasgaon Shirala in the Sangli Zilla Parishad elections | सांगली जि.प.मध्ये नवा पट, नवी समीकरणे; नेत्यांच्या पक्षांतराने बदलणार राजकीय चित्र

सांगली जि.प.मध्ये नवा पट, नवी समीकरणे; नेत्यांच्या पक्षांतराने बदलणार राजकीय चित्र

संतोष भिसे

सांगली : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागताच विविध राजकीय पक्षांनी मैदान मारण्याची तयारी सुरू केली आहे. तब्बल आठ वर्षांनी निवडणुका होत असल्याने बरीच गणिते नव्याने जमवावी लागणार आहेत. विशेषत: या कालावधीत बरीच राजकीय समीकरणे बदलली असल्याने राजकीय पक्षांना नव्याने पट मांडावा लागणार आहे.

गेल्या आठ वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे दोन भाग झाले. साहजिकच त्यांनाही सत्तेत वाटा द्यावा लागणार आहे. नव्याने राजकीय रिंगणात आलेल्या पक्षांना जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने आपली ताकद आजमावण्याची संधी मिळाली आहे. अर्थात, जिल्हा परिषदेवर आजवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेच सत्ता गाजवल्याचा इतिहास आहे. सध्या या पक्षांतील अनेक महत्त्वाचे मोहरे भाजप आणि शिंदेसेनेत आहेत. त्यामुळे त्यांचा राजकीय करिष्मा उमेदवार निवडून आणण्यासाठी फायद्याचा ठरणार का? याची उत्सुकता असेल.

जिल्हा परिषदेत सत्ता आणण्यासाठी भाजपसह महायुती ताकद लावणार हे निश्चित आहे. महायुतीला रोखण्यासाठी महाविकास आघाडीला एकसंधपणे लढत द्यावी लागेल. पण गेल्या आठवडाभरातील उद्धवसेना-मनसे युतीच्या घडामोडींमुळे महाविकास आघाडीच्या एकसंधतेविषयी चर्चा सुरू झाली आहे. जिल्हा परिषदांच्या निवडणुका युती आणि महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढण्याचे संकेत वरिष्ठ नेत्यांकडून दिले जात होते. पण त्यामध्ये मनसे कोठेही नव्हती.

आता महायुतीचा एक भाग असलेल्या उद्धवसेनेने मनसेसोबत हातमिळवणी केल्याने काँग्रेसच्या पातळीवर नाराजीचा सूर उमटू लागला आहे. अशीच स्थिती राहिल्यास जिल्हा परिषदेत महाविकास आघाडी एकत्र राहील का? याची उत्सुकता असेल. अर्थात, जिल्हा परिषदेत मनसे आणि उद्धवसेनेचे अस्तित्व नाही. त्यामुळे त्यांची युती काँग्रेस कितपत गांभीर्याने घेणार याकडे लक्ष असेल.

मिरजेत काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला धक्के

काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून अद्याप टिकून असलेल्या मिरज तालुक्यात जयश्री पाटील यांच्या भाजप प्रवेशाने गणिते बदलण्याची शक्यता आहे. अर्थात, अनेक काँग्रेसजनांनी जयश्री पाटील यांच्या मागे न जाता मदन पाटील म्हणून स्वत:चा गट शाबूत ठेवला आहे. या गटाची भूमिका मिरज तालुक्यात निर्णायक असेल.

आटपाडी, शिराळ्यात टशन 

आटपाडीत राजकीय वर्चस्व राखून असलेले राजेंद्रअण्णा देशमुख सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. तर तानाजी पाटील शिंदेसेनेचे नेतृत्व करतात. शिवाय तालुक्यात पडळकर गटही जोरात आहे. त्यामुळे या तालुक्यात टशन होणार हे स्पष्ट आहे. शिराळ्यातही भाजप, राष्ट्रवादीमध्ये (शरदचंद्र पवार) जोरदार लढत होणार हे निश्चित आहे. माजी आमदार मानसिंगराव नाईक हे विधानसभेतील पराभवाचे उट्टे काढण्यासाठी व आपला गट पुन्हा बळकट करण्यासाठी जिल्हा परिषदेला ताकद लावू शकतात.

तासगावमध्ये टोकाच्या लढती

तासगाव तालुक्यात विधानसभेला पीछेहाट झालेले माजी खासदार संजय पाटील यांना आपली ताकद वाढविण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीला संघर्ष करावा लागणार आहे. तर रोहित पाटील यांना विधानसभेची लाट कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. कवठेमहांकाळ, जत, पलूस, वाळवा आदी तालुक्यांतही महाविकास आघाडी व महायुतीमध्येच लढती रंगणार आहेत. खानापुरातील बाबर आणि पाटील गटांत राजकीय अस्तित्वाच्या लढती रंगणार आहेत.

Web Title: Signs of a close contest in Miraj Atpadi Jat Tasgaon Shirala in the Sangli Zilla Parishad elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.