मोपेड दुभाजकाला धडकून नेमबाज शरयू मोरेचा मृत्यू, बारामती येथील दुर्घटना; सांगलीच्या पोलिस निरीक्षकांची मुलगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 13:43 IST2025-09-01T13:41:55+5:302025-09-01T13:43:31+5:30

सातारा जिल्ह्यातील सासुर्वे या मूळ गावी तिच्यावर रविवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले

Shooter Sharyu More daughter of Sangli police inspector dies after moped hits divider in Baramati | मोपेड दुभाजकाला धडकून नेमबाज शरयू मोरेचा मृत्यू, बारामती येथील दुर्घटना; सांगलीच्या पोलिस निरीक्षकांची मुलगी

मोपेड दुभाजकाला धडकून नेमबाज शरयू मोरेचा मृत्यू, बारामती येथील दुर्घटना; सांगलीच्या पोलिस निरीक्षकांची मुलगी

सांगली : येथील सांगली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांची कन्या, राष्ट्रीय नेमबाज, रिनाऊंड शूटर शरयू संजय मोरे (वय २२) हिचा बारामती येथे मोपेड दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात मृत्यू झाला. सातारा जिल्ह्यातील सासुर्वे या मूळ गावी तिच्यावर रविवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

शरयू हिने नीट परीक्षेत सर्वोत्तम गुण मिळवले होते. बारामती येथे एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात ती शिक्षण घेत होती. शनिवारी रात्री बारामती ते भिगवण रस्त्यावरून वसतिगृहाकडे मोपेडवरून जाताना दुभाजकाचा अंदाज न आल्याने धडकून शरयू व तिची मैत्रीण जखमी झाली. उपचार सुरू असताना शरयूची प्राणज्योत मालवली.

शरयू हिने दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या ६७ व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत भाऊ आदित्य याच्याबरोबर निष्णात (रिनाऊंड शूटर)होण्याचा बहुमान मिळवला होता. खडतर समजल्या जाणाऱ्या १२ बोअर शॉटगन-ट्रॅप या क्रीडा प्रकारात तिने देदीप्यमान यश मिळविले. असा बहुमान मिळवणारी ती पश्चिम महाराष्ट्रीतील पहिली नेमबाज ठरली. राज्य, विभागीय आणि राष्ट्रीय स्पर्धेत पाच सुवर्ण, रौप्य, दोन कास्य पदकांची कमाई केली होती.

सासुर्वे येथे अंत्यसंस्कार

आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी ती सराव करीत होती, तसेच एमबीबीएसचे शिक्षण घेत होती. तिच्या आकस्मिक मृत्यूने मोरे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शरयूच्या अपघाती निधनाचे वृत्त समजताच रात्रीच अनेक पोलिस अधिकारी, कर्मचारी सासुर्वे येथे रवाना झाले. रविवारी सकाळी शरयूवर अंत्यसंस्कार झाले.

Web Title: Shooter Sharyu More daughter of Sangli police inspector dies after moped hits divider in Baramati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.