‘त्या’ पंचाला गोळ्या घाला, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचे वादग्रस्त विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 11:53 IST2025-02-04T11:51:53+5:302025-02-04T11:53:06+5:30
चंद्रहार पाटील म्हणाले, पृथ्वीराज मोहोळ याचे मी अभिनंदन करतो. त्यात पृथ्वीराजची काही चूक नाही. पंचांचा निर्णय वादग्रस्त आहे.

‘त्या’ पंचाला गोळ्या घाला, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचे वादग्रस्त विधान
सांगली/अहिल्यानगर : शिवराज राक्षेने लाथ घातली ही चूक झाली. जो कालच्या सामन्यात पंच होता, असल्या पंचांना गोळ्या घातल्या पाहिजेत, असे वादग्रस्त विधान सांगलीतील उद्धवसेनेचे नेते व डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी सोमवारी केले. तर शिवराजच्या कुस्तीत फिक्सिंग झाले असून पंचांवर कुस्ती संघाने कारवाई करावी, अशी मागणी राक्षे कुटुंबीयांनी केली आहे.
अहिल्यानगर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यातील उपांत्य सामन्याच्या निकालावरून राक्षे याने थेट पंचांची कॉलर पकडली आणि त्यांना लाथ मारली.
त्यावर चंद्रहार पाटील म्हणाले, पृथ्वीराज मोहोळ याचे मी अभिनंदन करतो. त्यात पृथ्वीराजची काही चूक नाही. पंचांचा निर्णय वादग्रस्त आहे. त्यामुळे राक्षेने लाथ मारून चूक केली, खरं तर त्याने पंचांना गोळ्या घालायला पाहिजे होत्या. मीही २००९ साली ट्रिपल महाराष्ट्र केसरीची कुस्ती स्पर्धा खेळताना या वादग्रस्त निर्णयाला बळी पडलो होतो. त्यावेळी मी आत्महत्या करण्याच्या विचारात होतो. त्यामुळे पंचांच्या चुकीच्या निर्णयाने एखाद्या चांगल्या खेळाडूचे करिअर अडचणीत येते, हे मी स्वत: अनुभवले आहे. त्यामुळे मी माझ्या मताविषयी ठाम आहे.
कुस्तीत फिक्सिंग झाले; राक्षे कुटुंबीयांचा आरोप
शिवराजच्या कुस्तीत फिक्सिंग झाले आहे, अशी भावना राक्षे कुटुंबीयांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. शिवराजची आई म्हणाली, आम्ही रात्रं-दिवस शेतीत काम करून शिवराजला पहेलवान केला आहे.
त्याच्यावर निलंबनाची कारवाई झाली, मग पंचांवर का कारवाई झाली नाही. गेल्या दहा वर्षांपासून माझ्या मुलावर हाच अन्याय सुरू आहे. तो शिवीगाळ करणारा मुलगा नाही; परंतु एवढा अन्याय झाल्यावर कोणाचाही संताप अनावर होईल. त्यातून त्याच्याकडून हे पाऊल उचलले गेले असेल, असे शिवराजची आई म्हणाली.
शिवराजच्या वहिनी म्हणाल्या की, आमचे सर्वच कुटुंब गेल्या १५ वर्षांपासून कुस्तीत आहे. डबल महाराष्ट्र केसरी, राष्ट्रीय सुवर्णपदक असे किताब शिवराज यांनी प्रामाणिकपणे पटकावले आहेत. या कुस्तीत रिप्लेची मागणी केली तरी ती धुडकावून लावण्यात आली. उलट पंचांनीच आधी शिवी दिली. मग त्यांच्यावरही कारवाई करायला हवी.
...तर १ कोटी देऊ
शिवराजवर पंचांनी अन्याय केला आहे. या कुस्तीचा व्हिडीओ जागतिक कुस्ती महासंघाकडे (डब्लूएफआय) पाठवा. त्यात शिवराज पराभूत झाल्याचे सिद्ध झाले तर आपण १ कोटी रुपये देऊ. -रणधीर पोंगल, शिवराजचे प्रशिक्षक
पंचांवरही कारवाई करू
राज्य कुस्तीगीर संघ नियमाने बांधलेला आहे. पंचांवर कारवाई करावी, अशा मागणीचा लेखी अर्ज शिवराजच्या कुटंबीयांंनी संघाकडे द्यावा. पंच दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई होईल. -संदीप भोंडवे, कार्याध्यक्ष, राज्य कुस्तीगीर संघ
फुटेज पाहून निर्णय घ्यावा
राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सीसीटीव्हीचे फुटेज पाहून तत्काळ निर्णय दिला जातो. स्पर्धा प्रमुखांनी या यंत्रणेचा वापर करून जागेवर निर्णय देण्याची गरज आहे. जेणेकरून कोणावरही अन्याय होणार नाही. -राम सारंग, आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक