जावईबाबूंची रॉयल एन्ट्री; कोल्हापुरातून हेलिकॉप्टरने गाठली सासरवाडी, हेलिकॉप्टर बघायला आटपाडीकरांची झुंबड
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 15:59 IST2025-10-06T15:58:49+5:302025-10-06T15:59:20+5:30
या घटनेची चर्चा केवळ संपूर्ण तालुक्यातच नव्हे, तर जिल्हाभर रंगली

जावईबाबूंची रॉयल एन्ट्री; कोल्हापुरातून हेलिकॉप्टरने गाठली सासरवाडी, हेलिकॉप्टर बघायला आटपाडीकरांची झुंबड
आटपाडी : आटपाडी तालुक्यात शनिवारी एक आगळावेगळा आणि रोमांचक प्रसंग अनुभवायला मिळाला. आटपाडीचे भाचे मामाच्या गावी थेट हेलिकॉप्टरने अवतरले ! या घटनेची चर्चा केवळ संपूर्ण तालुक्यातच नव्हे, तर जिल्हाभर रंगली आहे.
आटपाडी गावचे जावई असणारे, मूळ टोप संभापूर (जि. कोल्हापूर) येथील कॉन्ट्रॅक्टर शिवाजीराव आनंदराव पवार आणि त्यांची पत्नी शशिकला शिवाजीराव पवार हे आपल्या मुलांसह (सौरभ आणि सुयोग पवार) शनिवारी दुपारी आटपाडी येथे आले. खास गोष्ट म्हणजे, या कुटुंबाने मामाच्या गावी येण्यासाठी पारंपरिक रेल्वे किंवा चारचाकीचा वापर न करता स्वतःचे नवीन हेलिकॉप्टर वापरले. त्यामुळे आटपाडीच्या आकाशात हेलिकॉप्टर फिरताना पाहून नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली.
वाहन पूजनाच्या परंपरेत आता हेलिकॉप्टर पूजनाची भर पडल्याने आटपाडीकरांसाठी हा दिवस ऐतिहासिक ठरला. आधुनिकतेकडे वाटचाल करणाऱ्या ग्रामीण भागाच्या बदलत्या चित्राचे हे एक प्रतीक असून, या अनोख्या प्रसंगाची चर्चा बराच काळ रंगणार आहे.
हेलिकॉप्टर पाहण्यासाठी झुंबड
सौरभ आणि सुयोग पवार यांचे मामा योगेश आणि रवींद्र नांगरे हे आटपाडीत वास्तव्यास आहेत. त्यांनी आपल्या भाच्यांना नव्याने घेतलेल्या हेलिकॉप्टरच्या पूजनासाठी विशेष आटपाडीला बोलावले होते. नांगरे कुटुंबीयांनी या हेलिकॉप्टरचे पूजन मोठ्या उत्साहाने करून आपला आनंद साजरा केला. यावेळी तानाजी पाटील, दत्तात्रय पाटील तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. या पूजन सोहळ्यात शुभेच्छा देण्यासाठी आणि हेलिकॉप्टर पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.