'सेनापती'-'चंदा' मिलनाच्या मार्गावर, सह्याद्रीत एकत्र वावर कॅमेऱ्यात कैद
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 16:30 IST2026-01-28T16:29:38+5:302026-01-28T16:30:05+5:30
विकास शहा शिराळा : सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये अनेक वर्षांपासून ज्या सुवर्ण क्षणाची प्रतीक्षा होती, तो क्षण अखेर कॅमेऱ्यात कैद झाला ...

'सेनापती'-'चंदा' मिलनाच्या मार्गावर, सह्याद्रीत एकत्र वावर कॅमेऱ्यात कैद
विकास शहा
शिराळा : सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये अनेक वर्षांपासून ज्या सुवर्ण क्षणाची प्रतीक्षा होती, तो क्षण अखेर कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील रुबाबदार सेनापती आणि ताडोबातून स्थलांतरित झालेली चंदा नववर्षाच्या सुरुवातीला एकत्र वावरताना दिसत आहेत. चांदोली वन्यजीव विभागांतर्गत आंबा वनपरिक्षेत्रात या दोघांची भेट झाली असून, सह्याद्रीत वाघांचे कुटुंब विस्तारण्याच्या दृष्टीने हे मोठे यश मानले जात आहे.
सह्याद्रीमध्ये वाघांचे अस्तित्व पुनर्स्थापित करण्यासाठी २०१७ मध्ये 'वाघ पुनर्स्थापना' प्रकल्प राबविला गेला. भारतीय वन्यजीव संस्था आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प सुरू आहे.
वाघांसाठी पुरेसे खाद्य उपलब्ध व्हावे, यासाठी २०१७ ते २०२२ दरम्यान 'भक्ष्य संख्या वाढ' कार्यक्रम यशस्वी केला. नैसर्गिक प्रजननासाठी ताडोबा आणि पेंचमधून ८ वाघ (३ नर व ५ मादी) आणण्यास मंजुरी मिळाली. त्यापैकी 'चंदा' आणि 'तारा' वाघिणींचे यशस्वी स्थलांतर झाले.
सह्याद्री व्याघ्र राखीवमध्ये सद्य:स्थितीत सुरू असलेल्या वाघांचे संनियंत्रण पथकाच्या निरीक्षणावरून आणि कॅमेरा ट्रॅपमध्ये कैद झालेल्या माहितीवरून मागील आठवड्यापासून चांदोली वन्यजीव विभागांतर्गत आंबा वनपरिक्षेत्रात सेनापती व चंदा यांचा एकत्र वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांचा एकत्र वावर हा जंगलातील नैसर्गिक वर्तनाचा एक भाग आहे आणि प्रजनन प्रक्रियेच्या दृष्टीने सह्याद्री व्याघ्र राखीवसाठी हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे.
सेनापतीने मागील तीन वर्षांपासून सह्याद्री व्याघ्र राखीवमध्ये नैसर्गिक अधिवास तयार केला आहे. तसेच चंदा वाघिणीनेदेखील सेनापतीच्या अधिवास असलेल्या वनक्षेत्रात साधारणत: ३५ चौरस किलोमीटर वनक्षेत्रात नैसर्गिक अधिवास तयार केलेला आहे. ही बाब अत्यंत आशादायी असून, सेनापती व चंदा या नर-मादी वाघांचा एकत्र वावर सह्याद्रीमध्ये लवकरच वाघांची नैसर्गिक संख्या वाढण्यास मदत करेल.
सह्याद्रीसाठी हे महत्त्वाचे का आहे?
१. नैसर्गिक प्रजनन : मादी वाघांच्या कमतरतेमुळे सह्याद्रीत संख्या वाढत नव्हती, ती अडचण आता दूर होण्याची शक्यता आहे.
२. अधिवासावर शिक्कामोर्तब : स्थलांतरित वाघिणीने स्थानिक नर वाघाला स्वीकारणे, हे येथील पर्यावरण वाघांसाठी पूरक असल्याचे सिद्ध करते.
३. पर्यटन आणि पर्यावरण : वाघांची संख्या वाढल्यास भविष्यात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे महत्त्व जागतिक स्तरावर अधिक वाढेल.
४. ट्रॅप कॅमेऱ्यात नववर्षाच्या पहिल्या आठवड्यात रात्री १०:१३ वाजता चंदा मृत गव्याजवळ दिसली, तर त्याच रात्री ११:०२ वाजता त्याच ठिकाणी सेनापती दिसला. यावेळी त्याच्या पाठीमागे काही अंतरावर चंदा दिसली.
नर आणि मादी वाघांचा हा एकत्रित वावर नैसर्गिक वर्तनाचा भाग आहे. सह्याद्रीच्या जंगलात वाघांची संख्या नैसर्गिकरीत्या वाढण्याच्या दृष्टीने ही अत्यंत सकारात्मक आणि आनंदाची बातमी आहे. -तुषार चव्हाण, क्षेत्र संचालक सह्याद्री व्याघ्र प्रकल्प