Sangli ZP Election 2026: 'संयमाचा मुलामा'ने पडळकर विरोधकांना धोबीपछाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 19:31 IST2026-02-11T19:30:46+5:302026-02-11T19:31:07+5:30

आघाडी घोषणेपुरतीच : दुराव्याचा फटका

Sangli ZP Election 2026 Opposition fails to stop BJP MLA Gopichand Padalkar from entering Jat | Sangli ZP Election 2026: 'संयमाचा मुलामा'ने पडळकर विरोधकांना धोबीपछाड

Sangli ZP Election 2026: 'संयमाचा मुलामा'ने पडळकर विरोधकांना धोबीपछाड

प्रदीप कुलकर्णी

जत : आमदार गोपीचंद पडळकर यांच्या पराभवाच्या इराद्याने यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने कंबर कसली होती. मात्र पडळकरांनी विरोधकांचे सर्व मनसुबे उद्ध्वस्त करीत जिल्हा परिषदेच्या ९ पैकी ८ आणि पंचायत समितीच्या १८ पैकी १२ सदस्य विजयी करीत विरोधकांना जोरदार धोबीपछाड दिला. 

राज्यात सर्वत्र आक्रमक होणारे पडळकर जतमध्ये मात्र संयमाचा मुलामा परिधान करतात. या मुलाम्यावर खासदार विशाल पाटील यांच्यासह माजी आमदार विलासराव जगताप आणि विक्रमसिंह सावंत यांना त्यांनी 'इथे कितीही ताकद लावा, मीच इथला सिकंदर', हे ठासून सांगितले. अनेक उमेदवारांनी दीड हजार ते चार हजारांचे मताधिक्य घेऊन आपली मेख घट्ट केली आहे. तर, दुसरीकडे काँग्रेस व राष्ट्रवादीची महाविकास आघाडी घोषणेपुरतीच मर्यादित राहिली. ऐन निवडणुकीतील दुराव्याचा फटका त्यांना सोसावा लागला.

विधानसभा निवडणुकीत घोडदौड सुरू केलेल्या आमदार गोपीचंद पडळकर यांना रोखण्याची संधी नगरपालिका निवडणुकीवेळी आली होती. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी वेगवेगळी लढल्याने दोघांना फटका बसला. यातून धडा घेत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सर्व विरोधक एकत्र येत महाविकास आघाडीची घोषणा केली. पण जागा वाटपातच माशी शिंकल्याने या घोषणेवर विरजन पडले. दरीबडची आणि डफळापूर गटात दस्तुरखुद्द काँग्रेस आणि राष्ट्रवादी आमने-सामने होती. तर एकही जागा न दिल्याने उबाठा आणि रासपने अंग काढून घेतले. 

याशिवाय निवडणुकीच्या विक्रमसिंह सावंत आणि विलासराव जगताप एकत्रित दिसले नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांतही गोंधळ निर्माण झाला. या अस्वस्थतेच्या परिस्थितीने जिल्ह्यातील नेत्यांनीही पाठ फिरवली. या सगळ्याचा फटका महाविकास आघाडीला बसला. दुसरीकडे आक्रमक शैलीत असणारे आमदार पडळकर जतमध्ये संयम ठेवतात. म्हैसाळ योजना, पर्यटनाचा मुद्दा, एमआयडीसी, उद्योग, पाणी, शेती हे विकासाचे मुद्दे जनतेला पटवून देऊन पडळकर यांनी एकहाती लढाई लढली. त्यात त्यांना यशही आले. उमेदवारी देताना वाद टाळत व कार्यकर्त्यांना बळ देत या निवडणुकीत यश संपादन केले.

शिंदेसेनेचा फटका

शिंदे सेनेने बनाळी, शेगाव व संख येथे आपले उमेदवार उभे केले. त्यांच्या मतांची आकडेवारी बनाळी आणि संख गटात जास्त दिसून आली. त्याचा फटका काँग्रेस व राष्ट्रवादीच्या उमेदवारांना बसल्याचे स्पष्ट होते.

एकाकी झुंज

संपूर्ण तालुक्यात भाजपचे उमेदवार निवडून आल्याचे दिसून येत असले तरी जाडरबोबलाद गटात मात्र राष्ट्रवादीने बाजी मारली. येथे सावित्री रवी आणि भाग्यश्री तेली या लढत असल्या तरी आमदार पडळकर विरुद्ध माजी सभापती तमन्नगौडा रवी अशीच लढत पाहायला मिळाली. मात्र तमन्नगौडा यांनी एकाकी झुंज देत जिल्हा परिषदेबरोबरच पंचायत समितीचे सदस्यही निवडून आणले.

Web Title : सांगली ZP चुनाव में Padalkar की रणनीति, विपक्ष की योजनाएँ विफल

Web Summary : गोपीचंद पडळकर की रणनीति ने सांगली ZP चुनाव में निर्णायक जीत हासिल की, 9 में से 8 ZP सीटें और 18 में से 12 पंचायत समिति सीटें जीतीं। विपक्षी गठबंधनों के बावजूद, पडळकर का विकास पर ध्यान और रणनीतिक उम्मीदवार चयन उनकी सफलता का कारण बना, जबकि आंतरिक संघर्षों ने विपक्ष के प्रयासों को बाधित किया।

Web Title : Padalkar's Strategy Wins Sangli ZP Election, Defeating Opposition Plans

Web Summary : Gopichand Padalkar's strategic approach secured a decisive victory in the Sangli ZP election, winning 8 out of 9 ZP seats and 12 out of 18 Panchayat Samiti seats. Despite opposition alliances, Padalkar's focus on development and strategic candidate selection led to his success, while internal conflicts hindered the opposition's efforts.