Sangli ZP Reservation: मालगाव, म्हैसाळसह सात गटांत आरक्षणाची पुनरावृत्ती रद्द करा, बाबासाहेब मुळीक यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 17:35 IST2025-10-17T17:33:38+5:302025-10-17T17:35:03+5:30
मांगले, विसापूर, कुंडलमध्ये आरक्षणाची गरज

Sangli ZP Reservation: मालगाव, म्हैसाळसह सात गटांत आरक्षणाची पुनरावृत्ती रद्द करा, बाबासाहेब मुळीक यांची मागणी
सांगली : जिल्हा परिषदेच्या जागांचे आरक्षण काढताना चक्रानुक्रम पाळला गेला नाही. त्यामुळे झालेली आरक्षण प्रक्रिया रद्द करून नव्याने आरक्षणे काढावीत, अशी मागणी ॲड. बाबासाहेब मुळीक यांनी केली आहे.
पत्रकार बैठकीत त्यांनी सांगितले की, जिल्हा परिषदेच्या जागांसाठी १३ ऑक्टोबर रोजी आरक्षण काढण्यात आले. यामधील २९ गटांत अनुसूचित जाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व महिला आरक्षणाची पुनरावृत्ती झाली आहे. त्यामुळे पुढील गटांना या आरक्षणाची संधी हुकली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे राज्यघटनेला अपेक्षित असणारा आरक्षणाचा चक्रानुक्रम पाळला गेला नाही. गरज पडल्यास याबाबत कायदेशीर लढाई लढणार आहोत.
अनुसूचित जातीसाठी म्हैसाळ, मालगाव, कवलापूर, रांजणी, उमदी, सावळज हे गट आरक्षित झाले आहेत. म्हैसाळ गट १९९७ व २००२ मध्ये, बेडग गट २००२ व २०१७ मध्ये, मालगाव गट २००२ मध्ये, कवलापूर गट २००७ मध्ये, उमदी गट २००२ मध्ये, रांजणी गट २००२ मध्ये आणि सावळज २००२ च्या निवडणुकीत अनुसूचितसाठी आरक्षित होते. तेथे यावेळीही अनुसूचित जाती आरक्षणाची पुनरावृत्ती झाली आहे. या गटांवर अन्याय झाला आहे.
मुळीक म्हणाले, या निवडणुकीसाठी अनुसूचित लोकसंख्येच्या उतरत्या क्रमानुसार मांगले, अंकलखोप, विसापूर, बावची, खरसुंडी, कुंडल, शेगाव हे गट या जातीसाठी आरक्षित होणे आवश्यक होते; पण लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाचा चक्रानुक्रम प्रशासनाने पाळला नाही. त्यामुळे तेथील अनुसूचित उमेदवारांवर अन्याय झाला आहे.
मुळीक यांनी सांगितले की, खरसुंडी, वांगी, विसापूर, चिंचणी, मणेराजुरी, कुंडल, चिकुर्डे, कोकरूड, एरंडोली, कसबे डिग्रज हे गट सलग दुसऱ्यांदा सर्वसाधारण झाले आहेत. याउलट तडसर, देवराष्ट्रे, येळावी, कवठेएकंद, मणेराजुरी, ढालगाव, कासेगाव, वाटेगाव, पेठ, लेंगरे हे जिल्हा सर्वसाधारण होणे आवश्यक होते. सुमारे १२ गटांत सलग दुसऱ्यांदा महिला आरक्षण आले आहे. त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया जिल्हा परिषद कायद्याला अनुसरून नाही.
याबाबत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे ७ हरकती नोंदविल्या आहेत. त्यांनी त्यावर योग्य कार्यवाही न केल्यास उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. आरक्षणाची पुनरावृत्ती झालेल्या गटांतील कार्यकर्त्यांनीही हरकती दाखल कराव्यात. बाबासाहेब अमृतसागर, उमेश पाटील, बोधिसत्त्व माने, सचिन साबळे, अरविंद पाटील यांनी हरकती दाखल केल्या आहेत.
ओबीसी आरक्षणाचीही पुनरावृत्ती
मुळीक यांनी सांगितले की, नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी तडसर व पेठ हे गट सलग दुसऱ्यांदा आरक्षित झाले आहेत. मुचंडी, शेगाव, कडेपूर, देवराष्ट्रे, ढालगाव, अंकलखोप, बोरगाव, बुधगाव, समडोळी या गटांमध्येही नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षणाची पुनरावृत्ती झाली आहे. वास्तविक जाडरबोबलाद, माडग्याळ, कुची, दिघंची, निंबवडे, वाळवा, बावची, चिकुर्डे, संख, बिळूर, करंजे, एरंडोली, कवठेपिरान, सावळज, वाकुर्डे बु., कोकरूड हे गट नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित होणे आवश्यक होते.