नव्या वर्षामध्ये सांगलीकरांच्या दिमतीला ई-बससेवा, आयुक्तांनी मिरजेतील डेपोच्या कामाची केली पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 17:54 IST2025-10-04T17:53:30+5:302025-10-04T17:54:18+5:30
सांगली : महापालिका क्षेत्रात नागरिकांसाठी ई-बस सेवा जानेवारी-फेबु्रवारीमध्ये सुरू करण्याचा मानस आहे. त्यामुळे मिरज येथे सुरू असलेल्या ई-बस डेपोचे ...

संग्रहित छाया
सांगली : महापालिका क्षेत्रात नागरिकांसाठी ई-बस सेवा जानेवारी-फेबु्रवारीमध्ये सुरू करण्याचा मानस आहे. त्यामुळे मिरज येथे सुरू असलेल्या ई-बस डेपोचे काम डिसेंबरपर्यंत दर्जेदार व गतीने पूर्ण करावे, अशा सूचना आयुक्त सत्यम गांधी यांनी दिल्या.
केंद्र शासन पुरस्कृत पी. एम. ई-बस सेवा योजनेअंतर्गत महापालिका क्षेत्रात ई-बसेस सुरू होणार आहेत. त्यासाठी मिरज येथे बस डेपोचे काम सुरू करण्यात आले आहे. या नियोजित बस डेपोवर सुरू असलेल्या स्थापत्य व विद्युतीकरण कामांची पाहणी आयुक्त सत्यम गांधी यांनी केली. या पाहणीदरम्यान आयुक्तांनी सद्यस्थितीचा आढावा घेतला. तसेच काम गतीने व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचनाही संबंधित विभागांना दिल्या. शिवाय बस डेपोचे काम गतीमान होऊन नागरिकांना लवकरच या योजनेचा लाभ मिळेल, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला.
यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त स्मृती पाटील, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता अमर चव्हाण, प्र. कार्यकारी अभियंता विनायक जाधव, उपअभियंता महेश मदने, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण विभागाचे कार्यकारी अभियंता आशिष मेहता आदी उपस्थित होते.
५० बसेस मिळणार
केंद्र सरकारच्या पीएम-ई बस योजनेत १०० बसगाड्यांना तत्त्वतः मंजुरी मिळाली आहे. महापालिकेने पहिल्या टप्प्यात ५० ई बसेस चालवणार आहे. १२ मीटर लांबीच्या २०, तर ९ मीटर लांबीच्या ३० मिनी बसेस महापालिकेकडे दाखल होणार आहे. मिरजेत मध्यवर्ती स्थानकांत चार्जिंग स्टेशन असेल. या कामासाठी दहा कोटींचा निधी खर्च होणार आहे.
केंद्राकडून अनुदान
केंद्र सरकार ही वाहने चालवण्यासाठी प्रतिकिलोमीटर २४ व २२ रुपये अनुदान देणार आहे. या योजनेसाठी महापालिकेच्या स्तरावर परिवहन समिती नियंत्रण स्थापन केली जाणार आहे. बस चालवण्यासाठी देखभालीसह ठेकेदाराची नियुक्ती केली जाईल. अनुदान व प्रवासी तिकीट उत्पन्नासह अन्य जाहिरातीस अन्य स्थानिक उत्पन्नातून ही बस चालवण्याची जबाबदारी महापालिकेची असणार आहे.