विशाल पाटलांचा प्रचार करताना माजी आमदार विलासराव जगताप यांच्या गाडीवर हल्ला; पाच हल्लेखोरांवर तक्रार
By हणमंत पाटील | Updated: April 25, 2024 14:10 IST2024-04-25T14:09:34+5:302024-04-25T14:10:38+5:30
भाजपा उमेदवारावर केले आरोप.

विशाल पाटलांचा प्रचार करताना माजी आमदार विलासराव जगताप यांच्या गाडीवर हल्ला; पाच हल्लेखोरांवर तक्रार
जत : जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्या गाडीवर मिरवाड ते डफळापूर दरम्यान काल रात्री हल्ला केल्याप्रकरणी जत पोलीस ठाण्यात पाच जणांच्या विरोधात विलासराव जगताप यांनी फिर्याद व तक्रार दाखल केली आहे.
जिरग्याळ येथील बैठक संपवून बुधवारी सायंकाळी 06.30 वाजता मिरवाड ते डफळापूर दरम्यान मधील हांडेमळा, मिरवाड येथून स्वतः जगताप, संग्राम जगताप, सुनील तुकाराम छजे असे गाडीतून जात असताना 5 इसम दोन दुचाकीवरुन आले. त्यातील एका दुचाकी हिरो कंपनीची स्प्लेंडर दुचाकी के एम. एवं 10 सी डी 2203 यावरुन येवुन जगताप यांच्या कारचे उजव्या बाजूस त्यांच्या हातातील रॉडने काचेवर मारू लागले. त्यावेळी गाडीचे उजव्या आरश्यावर रॉड लागल्याने आरसा पूर्ण फूटला असता चालक सागर याने तात्काळ कार रस्त्याचे बाजुला घेतली.
त्यावेळी माझेसोबत असलेला सुनील तुकाराम छले याने मला आमचे गाडीवर तसेच आमच्यावर हल्ला करण्यासाठी आलेले इसम बाबु हराळे, सायता पाटील, राहुल संकपाळ, अन्नु ढोले व मेजर संकपाळ सर्व रा. जिरग्याळ ता.जत येथील असल्याचे सांगितले. हे इसम हे आम्ही प्रचार करीत असलेल्या विशाल पाटील याचे विरोधी उमेदवार संजय पाटील यांच्या गटातील असून, मी विशाल पाटील यांचा प्रचार करु नये, मी घरात बसुन रहावे या उद्देशातून गाडीवर हल्ला केला आहे. त्यांच्या हातातील लोखंडी रॉडने गाडीचे उजव्या आरशावर मारुन आरसा फोडून 30 हजार रुपयांचे नुकसान केले आहे, असे तक्रारीत जगताप यांनी म्हटले आहे.