नागपूर येथील सोनेतस्करी प्रकरणी सांगलीतील सराफ ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 13:28 IST2025-05-24T13:28:24+5:302025-05-24T13:28:59+5:30
महसूल गुप्तचर संचालनालयाची केंद्रीय कारवाई

संग्रहित छाया
मिरज : नागपूर येथील सोने तस्करी प्रकरणी सांगली येथील एका सराफाचे कनेक्शन असल्याचे निष्पन्न झाले आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या पथकाने शुक्रवारी सांगलीत येऊन संबंधित सराफास ताब्यात घेतले. मिरजेत केंद्रीय जीएसटी कार्यालयात दिवसभर त्याची चौकशी करण्यात आली.
नागपूर येथे तीन किलो सोन्याची तस्करी प्रकरणात सांगली जिल्ह्यातील विटा येथील काही जणांचा सहभाग आढळला. त्यांनी सांगलीत एका सराफाला सोने विक्री केल्याची कबुली दिली. याबाबत महसूल गुप्तचर संचालनालयाचे पथक गेले काही महिने तपास करीत होते. याबाबत सांगलीतील एका सराफाने तस्करीतील सोने विकत घेतल्याची माहिती पथकाला मिळाल्याने सांगलीत टिळक चौकात छापा टाकून सराफाला ताब्यात घेऊन नागपूर येथे नेण्यात आले.
महसूल गुप्तचर संचालनालयाच्या पथकांत मुंबई, पुणे व नागपूर येथील अधिकाऱ्यांचा सहभाग होता. स्थानिक जीएसटी विभागाच्या मदतीने सराफावर छापा टाकण्यात आला. या छाप्यामुळे सराफ व्यावसायिकांत खळबळ उडाली होती. मात्र या घटनेबाबत स्थानिक अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास नकार दिला.